प्रौढ व्यक्तींसाठी 40 रुपये प्रवेश शुल्क वाढीस स्थायीची मान्यता
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्रौढ व्यक्तींसाठीचे प्रवेश शुल्क आता 40 रुपये लागणार आहे. त्यामुळे आता तीन व्यक्तींचे कुटुंब त्यांच्या 5 वर्षांच्या आतील मुलासह संग्रहालयास भेट देण्यासाठी गेल्यास त्यांना जवळपास 90 रुपये मोजावे लागणार आहेत. आता उद्यानात पार्किंगसह तिकीट शुल्कापोटीच 100 रुपये मोजावे लागणार आहेत. कारण उद्यानासाठी प्रशासनाने ठेवलेल्या प्रवेश शुल्कवाढीच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या प्राणिसंग्रहालयाचे सध्याचे प्रवेश शुल्क यापूर्वी 13 ऑक्टोबर 2015मध्ये वाढविण्यात आले होते. त्यातच प्राणी संग्राहालयाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. प्राण्यांची संख्या आणि दिल्या जाणार्या सुविधांचा विचार करता सध्याच्या शुल्कात वाढ करणे आवश्यक असल्याचे मत प्राणिसंग्रहालय सल्लागार समितीने दिले होते.
वार्षिक खर्चात सेवकांचे वेतन, प्राण्यांचे खाद्य, औषधे, खंदक देखभाल व दुरूस्ती यावर मोठा खर्च होतो. नियोजित मास्टर प्लॅनमध्ये खंदक निर्मिती, नवीन सर्पोद्यान निर्मिती, जलचर पक्ष्यांसाठी अद्ययावत पिंजरे, प्राणी प्रजनन केंद्र, निसर्ग निर्वचन केंद्र अशी विकास कामे प्रस्तावित असून त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी प्रवेश शुल्क वाढविणे आवश्यक असल्याचे सल्लागार समितीने सुचविले होते. त्यानुसार, समितीने या दरवाढीस मान्यता दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रशासनाने हे शुल्क 25 रुपयांवरून दुप्पट करत 50 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, समिती सदस्यांनी उपसूचना देत हे शुल्क 50 ऐवजी 40 रुपये करण्यास मान्यता दिली आहे.या शुल्कवाढीमुळे संग्रहालयाच्या पर्यटक संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे.