कात्रज घाटरस्ता ठरू शकतो जीवघेणा!

0

कात्रज : शहराचे प्रवेशद्वार समजला जाणार्‍या कात्रजच्या घाटरस्त्याची दुरवस्था प्रवाशांसाठी जीवघेणा ठरू शकते. या घाट रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून सगळ्या बाजूला खड्डेच खड्डे पडले आहेत. वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग येथे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग शिंदेवाडी ते जांभूळवाडी बोगद्यातून वळवल्यापासून कात्रज घाट रस्त्याला विशेष राज्य मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. तेव्हापासूनच कात्रज घाट रस्त्याची दुरवस्था झाली. येथे होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही वर्षांत दुरुस्तीचे चक्र बिघडले आहे. महामार्ग वळवला तरी कात्रज घाटातील वाहतूक वाढतच राहिली आहे. परिणामी कमकुवत बनलेल्या या घाट रस्त्याची दरवर्षी चाळण होत आहे.

घाटातील एकूण बावीस डाव्या व उजव्या वळणांपैकी बर्‍याच धोकादायक वळणांवर हमखास खड्डे पडतात. दुहेरी वाहतूक असलेल्या या मार्गावर खड्डे चुकविण्यासाठी केलेला प्रयत्न अपघाताला कारणीभूत ठरत आहे. शहराकडे येणार्‍या वाहनांसाठी बोगदा परिसरातील तीव्र उतारावरील सात वळणांवर पडलेले मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत.