कात्रज प्राणीसंग्रहालयात सिंह दर्शन

0

पुणे : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात नव्याने दाखल झालेल्या आशियाई सिंहाच्या जोडीला पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. राज्यातील ही पहिली अशियाई सिंहाची जोडी असून, पुण्यात प्रथमच सिंहाचे आगमन झाले आहे. नर तेजस (वय 6 वर्षे 5 महिने) व मादी सूबी (वय 7) ही सिंहाची जोडी पर्यटकांना आता पाहता येणार आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयासाठी नियोजित आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गुजरात वनविभाग व सक्करबाग प्राणी संग्रहालय यांना 5 विदेशी पक्षी देण्यात आले. त्याबदल्यात राजीव गांधी प्राणी संग्रहालयास ही सिंहाची जोडी देण्याचा करार महाराष्ट्र व गुजरात वनविभागामध्ये करण्यात आला होता. प्राण्यांची अदलाबदली करण्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर 25 डिसेंबर 2016 रोजी रात्री 2.30 वाजता या सिंहाच्या जोडीला प्राणी संग्रहालयातील क्वारंन्टाइन विभागातील पिंजर्‍यात दाखल करण्यात आले. त्यांना पशुवैद्यकिय चिकित्सकांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले होते. हवामानाशी मिळते-जुळते घेतल्यावर या सिंहाच्या जोडीसाठी स्वतंत्र खंदक तयार करण्यात येत आहेत. खंदक तयार करण्याचे काम पुर्ण होईपर्यंत या सिंहाच्या जोडीचा मुक्काम पांढर्‍या वाघाच्या खंदकात राहणार आहे, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली. यावेळी अतिरीक्त आयुक्त राजेंद्र जगताप, शामराव खुळे, दिपक धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंहाच्या जोडीला घेतले दत्तक
या सिंहाच्या जोडीला केदार कासार यांनी दत्तक घेतले असून पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी जो काही खर्च होणार आहे तो खर्च कासार देणार आहेत. त्यासाठी कासार यांनी राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. जाधव यांना चार लाखाचा धनादेश सूपुर्त केला.

आता प्रतिक्षा नव्या प्राण्याची
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पहिल्या टप्प्यात सिंह आणल्यानंतर आता जिराफ झेब्रा, जंगल कॅट, असे विविध प्राणी आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. त्यामुळे येत्या काही वर्षात राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कोणकोणते प्राणी दाखल होतील याची उत्सुकता पर्यटकांमध्ये आहे.