कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; 4 ठार

0

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडीजवळ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ घडली. मृतांमध्ये तीन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. हे कुटुंबीय सायन, मुंबई येथील रहिवासी असून, ते मुलीला सोडण्यासाठी पुण्यात आल होते. मुलीला पुण्यात सोडून सातारकडे निघाले असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

कारचाही चुराडा झाला
पोलिसांनी सांगितले, की मुंबईत राहणारे यशवंत माने (वय 55), शारदा यशवंत माने (वय 46), ऋषीकेश यशवंत माने (वय 17) हे मुलीला सोडण्यासाठी पुण्यात आले होते. तिला पुण्यात सोडून हे कुटुंबीय आपल्या मारूती अल्टो कारने सातार्‍याकडे निघाले होते. पहाटेच्या सुमारास माने यांच्या भरधाव कारने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, चालकासमवेत कारमध्ये असलेल्या माने कुटुंबीयांचा जागीच मृत्यू झाला. कारचाही चुराडा झाला.

मुलगी शिक्षणासाठी पुण्यात
अपघातावेळी अल्पवयीन ऋषीकेश माने हा कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालक कृष्णा सुर्वे (वय 65) यांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांचेही मृतदेह ससून रूग्णालयात नेण्यात आले. माने यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी माने कुटुंबीय रविवारी पुण्याला आले होते. तिला सोडून ते फलटणला निघाले होते, असे सांगण्यात येते. माने कुटुंबीय मुंबईतील चुनाभट्टी येथे राहत.