कात्रज । कात्रजकडून खडीमशीन चौकाकडे जाताना कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील टेम्पोवर धडकला. पुढील दोन वाहनांना मागून येणारा ट्रक धडकून जागेवर गोल फिरल्याने पुढील तीन वाहनांना धडकला. या अपघातात आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. तीन जण किरकोळ जखमी असून एक जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात कंटेनर ड्रायव्हर राजकिरण रामलाल कोरी (25 रा.रामपूर,उ.प्र.) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रकाश विलास माने (रा.इस्लामपूर) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून संतोष डोंगरे (रा.पिपळे निल्लख) सदाशिव चौढा हे दोघे जखमी झाले आहेत. अहमदाबादहून कात्रजकडून खडीमशीन चौकाकडे बाराचाकी कंटेनर (क्रमांक-आर.जे.37 जे.ए.2612) हा फरशी घेऊन जात असताना कोंढवा बुद्रुक येथील स्मशानभूमी जवळील उताराला ब्रेक निकामी झाला. त्यासुमारास समोरून खडीमशीन चौकाकडून कात्रजच्या दिशेने जाणार्या टाटा टेम्पो (क्रमांक-एम.एच.10 बी.आर.3604) याला धडकला. त्यानंतर त्याची धडक स्कॅार्पिओ (क्रमांक-एम.एच.04 एफ.जेड.6519), ट्रक (क्रमांक-एम.एच 14 ए.एस.8177) याला धडकला. त्यासुमारास मागून येणारा आयशर ट्रक (क्रमांक-एम.एच.48 ए.जी.3893) या वाहनांना धडकून आडवा झाला. त्यानंतर त्यासुमारास समोरील व बाजूला असणारी वाहने स्कोडा गाडी (क्रमांक-एम.एच.12 जी.व्ही.7835) मारुती सुझुकी (क्रमांक-एम.एच.48.ए.सी.5264) व दुचाकी (क्रमांक-एम.एच.12.एल.एन.5180) या वाहनांची एकमेकांना धडक बसली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताच घडताच याभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर चार तास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक विभागाच्या कर्मचार्यांनी क्रेनच्या साह्याने ट्रक खडीमशीन चौकी समोरील मोकळ्या जागेत हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली. कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहे.