कानगाव येथील शेतकर्‍यांचे पाचव्या दिवशी अर्धनग्न आंदोलन

0

यवत । राज्य सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींसह विविध मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकर्‍यांनी (दि.2)पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून संपाच्या पाचवा दिवशी संपकरी शेतकर्‍यांनी अर्धनग्न अवस्थेत घोषणा देत फडणवीस सरकारचा निषेध केला.

या संपला पुणे जिल्ह्यासह नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील 122 गावांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संपकरी शेतकर्‍यांनी यावेळी दिला. वेळप्रसंगी आत्मदहन करण्यास शेतकरी मागे-पुढे पाहणार नसल्याचे संपकरी शेतकर्‍यांनी सांगितले. या संपाला यापूर्वीच बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्यासह आदी पक्ष व संघटनांनी पाठींबा दिला आहे. तर संपकरी शेतकर्‍यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली असता याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्‍वासन पवार यांनी दिले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा शेतकरी संप सुरू ठेवणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

रस्त्यावर संपकरी शेतकरी उतरणार
गेली पाच दिवसापासून शांततेच्या गांधीगिरीच्या मार्गाने अवलंब केलेल्या आंदोलनाला सरकारच्या वतीने कोणीही चर्चेला आले नाही. सरकार हे आंदोलन चिघळू पाहत आहे. मंगळवारपासून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. वेळप्रसंगी सरकारच्या निषेधार्थ सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा राज्यव्यापी संपकरी शेतकरी कृती समितीचे समन्वयक माऊली शेळके यांनी दिला आहे.