यवत । दौंड तालुक्यातील कानगाव येथील संपकरी शेतकरी आंदोलनाचा सोळावा दिवस असून शुक्रवारी (दि.17) येथील संपकरी शेतकर्यांनी विद्युत वितरण कंपनीने शेतकर्यांना दि.15 नोव्हेंबरपर्यंत मुदतीची वीजबिले दिली होती. ही वीजबिले न भरल्यास शेतीचा विद्युतपुरवठा खंडीत करण्याचा सरकारने इशारा दिला होता. यापार्श्वभूमीवर वीजबिलांची होळी करीत सरकारविरोधी घोषणा देत फडणवीस सरकारचा निषेध केला. येथील शेतकर्यांनी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव यासह आदी 11 मागण्यांसाठी (दि.2) पासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत हे सुरू असलेले आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा येथील शेतकर्यांनी निर्धार केला आहे.
या शेतकरी आंदोलनाला यापूर्वी पाठिंबा म्हणून तालुक्यातील खुटबाव, देवकरवाडी, यवत, रावणगाव, पाटस, वरवंड, देऊळगावराजे या गावांनी संपूर्णपणे गावे बंद ठेवत पाठिंबा दिला आहे. तर कानगावच्या आंदोलनकर्त्या शेतकर्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राहुल जगताप, राहुल कुल, बाबुराव पाचर्णे, शंकर आण्णा धोंडगे आदींनी प्रत्येक्ष भेटून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सरकार व्हिलन आहे का?
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे (दि.12) दौंडमधील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकरी हा आमच्या सरकारचा खरा हिरो आहे, असे फडणवीस म्हणाले होते. मग शेतकरी या सरकारचा खरा हिरो आहे तर मग कानगाव येथे गेल्या 16 दिवसांपासून शेतकर्यांचे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करीत मग हे सरकार शेतकर्यांचा व्हिलन आहे का? असा आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला आहे.