भाजपला हे चांगले माहीत आहे काँग्रेस आणि जनतादल सेक्युलर हे एकमेकांचे विरोधक जास्त काळ हातात हात घालून एकत्र राहू शकत नाहीत. म्हणूनच लोकसभा निवडणुकीआधी हे सरकार कसे पाडता येईन त्यांची बदनामी कशी करता येईन याचा आटापिटा भाजप सतत करत राहीन, अशी जास्त शक्यता आहे. काँग्रेस-जनता दलाची आघाडी आणि सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामी आणि सिद्धरामय्यांचा कस लागणार आहे. कुमारस्वामींच्या शपथविधीनंतर खर्या अर्थाने कर्नाटकातील नाटकाचा पुढचा अंक रंगायला सुरुवात होईन.
कानडी मुलखातल्या सत्तासंघर्षाच्या नाटकाचा पुढचा अंक आता सुरू झाला आहे. कर्नाटकात उद्या बुधवारी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन होणार असून, कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळालेले नाही. भाजपचे राज्यातील प्रमुख नेते बी.एस. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण बहुमताअभावी ते औटघटकेचे मुख्यमंत्री ठरले. 224 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेस आणि जेडीएसकडे एकत्रित मिळून 116 आमदार आहेत. काँग्रेसचे 78 आमदार निवडून आले आहेत. सध्याच्या कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीने मला आनंद झालेला नाही. मी लोकांना भरपूर आश्वासने दिली आहेत. मला बहुमताने मुख्यमंत्री बनायचे होते, पण लोकांना माझ्यावर आणि माझ्या पक्षावर तितका विश्वास नाही. मी संधीसाधू राजकारणी असल्याचा माझ्यावर आरोप होत आहे त्याची मला कल्पना आहे, असे कुमारस्वामी आता म्हणत आहेत. सिद्धरामय्या आणि कुमारस्वामींच्यामधून विस्तव जात नाही हे सर्वश्रुत आहे. त्यावरही कुमारस्वामी आता बोलले आहेत. मला अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद नको होते. पण ते आता महत्त्वाचे नाही. सध्याच्या घडीला सरकार स्थापन करून ते प्रभावीपणे चालवणे महत्त्वाचे आहे. सिद्धरामय्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. निवडणुकीच्या आधी ते जे काही बोलले तो भूतकाळ आहे मी भविष्याकडे पाहतो आहे, असे कुमारस्वामींनी म्हटले आहे. कुमारस्वामी सध्या खूप सावध भूमिका घेत आहेत, तर काँग्रेस आलेल्या संधीने भाजपला नमवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर मिळालेल्या जागा पाहिल्या तर काँग्रेसचीही कर्नाटकात लाज गेली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दल- सेक्युलरला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. वास्तविक, भाजपला निर्विवाद बहुमत मिळण्यात अपयश आले असले, तरी कर्नाटकच्या मतदारांचा कौल स्पष्ट होता. त्यांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला स्पष्टपणे नाकारले होते. आता कुमारस्वामींपुढे मुख्यमंत्रीपदाचे गाजर ठेवून कर्नाटकात काँग्रेसने लाज झाकली असली, तरी भाजपचा विस्तार झाकता येणार नाही.
भाजपची ताकद वाढली हे वास्तव आहे व या वाढत्या ताकदीमुळेच भाजपबरोबर आघाडी करण्यास कुमारस्वामी तयार झाले नाहीत. आक्रमक भाजपपेक्षा दुबळी काँग्रेस परवडली, असा हिशेब त्यांनी केला. मात्र, कर्नाटकातील दिलजमाई फसवी आहे आणि त्यानिमित्ताने होणारा प्रादेशिक पक्षांचा शो हाही मोदींच्या अनेक इव्हेंटप्रमाणे एक इव्हेंट आहे. कुमारस्वामींचा उद्याचा सोहळा देखणा होईल व त्याला झाडून सारे मोदी विरोधक हजेरी लावतील. माध्यमांमध्ये त्याची रसभरीत चर्चाही होईल. भाजपलाही चांगले माहीत आहे की हे एकमेकांचे विरोधक जास्त काळ हातात हात घालून एकत्र राहू शकत नाहीत. कर्नाटकमधील ज्या मतदारसंघात सेक्युलर जनता दल विजयी झाला आहे, त्यातील बहुतांश ठिकाणी त्या पक्षाने काँग्रेसचा पराभव केला आहे. काँग्रेस व सेक्युलर जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पश्चिम बंगालप्रमाणे हाणामारी झाली आहे. देवेगौडा व भाजप यांच्यात साटेलोटे आहे. या राहुल गांधींच्या प्रचारामुळे मुस्लीम मतदारांवरील पकड सुटली याचा राग कुमारस्वामींच्या मनात आहे. गौडा कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या हसन जिल्ह्यात भाजपचा शिरकाव झाला तो मुस्लीम मते फुटल्यामुळे, असे सेक्युलर जनता दलांच्या नेत्यांचे मत आहे. सेक्युलर जनता दल व काँग्रेस एकत्र आल्यामुळे दक्षिण कर्नाटकातील या पट्ट्यात भाजपला पाय टाकण्यास जागा मिळेल ही वस्तुस्थिती आहे. सेक्युलर जनता दलाचा विस्तार संपूर्ण कर्नाटकात नाही. यामुळे काँग्रेस व देवेगौडा यांची दिलजमाई झाली असली, तरी कार्यकर्त्यांच्या पातळीवर मने जुळणे अवघड आहे. 30ः30 महिन्यांचे मुख्यमंत्रीपद हा फॉर्म्युला असल्याच्या चर्चा वर्तमानपत्रातून सुरू झाल्या होत्या त्याला कुमारस्वामीने धुडकावून लावले आहे. आता मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाच्या वाटाघाटीत चढाओढ होईल.
ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम अशा मलिदा देणार्या खात्यांवर काँग्रेस व जद या दोघांचा डोळा आहे. भाजपची बी टीम असे काँग्रेसकडून जनता दलाला हिणवण्यात येत होते. पण स्वत: काँग्रेस मंत्रिमंडळात बी टीम म्हणून राहणार नाही आणि कुमारस्वामी व देवेगौडा थोडीही सत्ता सोडणार नाहीत. बारा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यामुळे जनता दलाला सत्तेची अधिक गरज आहे. त्या जीवावरच 2019 व पुढील विधानसभा निवडणूक लढण्याची ताकद मिळणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी जनता दलाकडून अधिक रस्सीखेच चालेल. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने खात्यांचे वाटप करताना त्यांना कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला 30 तर जेडीएसच्या वाट्याला 15 ते 17 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जात, धर्म, प्रांत या सार्याबाबींचा विचार करून मंत्रिपदे व खाती वाटावी लागणार आहेत. त्यात काँग्रेस आणि जनता दला सेक्युलर या दोन्ही पक्षांची कसरत आहे. शिवाय सोबत ठाम राहिलेले अपक्ष व बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचे काय करायचे याचाही विचार या पक्षांना करावा लागणार आहे, तर दुसर्या बाजूला लोकसभा निवडणुकीआधी हे सरकार कसे पाडता येईन, त्यांची बदनामी कशी करता येईन याचा आटापिटा भाजप सतत करत राहीन, अशी जास्त शक्यता आहे. काँग्रेस-जनता दलाची आघाडी आणि सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामी व सिद्धरामय्यांचा कस लागणार आहे. कुमारस्वामींच्या शपथविधीनंतर खर्या अर्थाने कर्नाटकातील नाटकाचा पुढचा अंक रंगायला सुरुवात होईन.