कानबाई विसर्जनावेळी तीघे बचावले ; एक बेपत्ता

0

शिंदखेडा । तालुक्यातील मुडावद येथे कानबाई मातेचे विसर्जन करायला गेलेले चार तरूण तापी पात्रात पडले. चौघे वाहून जात असतांनाच गावातील काही तरूणांनी ऊड्या मारून तिघांना वाचविण्यात यश मिळविले. एक मात्र सायंकाळी 4 पर्यंत बेपत्ताच होता. ही घटना सोमवार 31 जुलै रोजी सकाळी दहाच्या सूमारास ही घटना घडली. खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्याची परंपरा आह़े. सोमवारी सकाळी शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे कानबाई मातेच्या विसजर्नाची लगबग सुरु होती. गावालगतच तापी नदी आह़े सध्या तापी नदीला पूर आलेला आह़े तरीदेखील या ठिकाणी मुर्ती विसर्जन करण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.

कानुबाईची मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले चार तरुण तापी नदीत पडल़े यात सागर विजय निकुंभ, बंटी विजय निकुंभ, राजेश राजू निकुंभ, पंकज राजू निकुंभ यांचा समावेश होता. नदीत पडल्याने ते काही अंतर वाहून जात असतांनाच घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तातडीने गावातील अनिल शिरसाठ, चेतन बोरसे, प्रकाश कोळी, राजेंद्र परदेशी, सुनील मोरे यांनी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता नदीत या तरुणांना वाचविण्यासाठी उडी मारली. तिघांना वाचविण्यात त्यांना यश आल़े पण, सागर विजय निकुंभ या तरुणाला वाचविण्यात त्यांना यश आले नव्हते. सायंकाळी चार पर्यत तो बेपत्ताच होता. घटनास्थळी गर्दी जमा झाली असून बेपत्ता तरुणाचा शोध सुरु आहे.