कानळदा ते विदगाव रस्त्याचे भुमिपुजन

0

जळगाव । मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील गावे पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व गावे एकमेकांना जोडण्यात येऊन गावांच्या विकासाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी 25 रोजी दिली. विदगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास योजनेतंर्गत कानळदा ते विदगाव तालुका हद्द या 7.20 कि.मी. लांबीच्या 4 कोटी 42 लाख 21 हजार रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सदस्य तुषार महाजन, नंदू पाटील, जना कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी, नानाभाऊ सोनवणे, डॉ.कमलाकर पाटील, सरपंच भगवान कोळी, पुंडलिक बावीस्कर, शाम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

गाव विकासाला मदत रस्त्यांच्या विकासातूनच शेतकर्‍यांचे हित साध्य होते. दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात व मतदार संघात रस्त्यांचे जाळे विणण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला मदतच होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, तर या रस्त्यावर 7 मोर्‍या बांधण्यात येणार असून या रस्त्यामुळे नागरीकांचा 10 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे परिणामी नागरिकांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे.

पूलासाठी 55 कोटी
खेडी भोकर पुलासाठी 55 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्यमंत्री पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी कौतूक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, पन्नालाल पाटील, दिलीप जगताप, नारायण पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव सोनवणे यांनी तर आभार बंडु कोळी यांनी मानले.