कानिफनाथांचा आजपासून पंचम यात्रोत्सव

0

रावेर । तालुक्यातील खानापूर येथे खान्देशसह मध्यप्रदेशातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान तथा आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ उर्फ कन्हैय्यालाल महाराज यांच्या यात्रोत्सवाला खानापूर बुधवारपासून अर्थात 17 जानेवारी पासून सुरूवात होत आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दत्तमंदिराचे नुतनीकरण संस्थान तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मंदिर परीसर रोशनाई करण्यात आली आहे.

नवस फेडण्यासाठी गर्दी
पुरातन काळापासून प्रदीर्घ परंपरा असलेली ही यात्रा होशंगाबाद जिल्ह्यातील पंचगढी येथे कसोटीत उतरलेल्या स्व.परशुराम भगत यांना कानिफनाथांचा साक्षात्कार झाल्याने खानापूर येथे त्यांनी गादीची स्थापना करून परीरसरात पंचग यात्रोत्सवास प्रारंभ झाला. या यात्रोत्सवात नवस मानणार्‍यांसह फेडणार्‍यांची मोठी गर्दी होते.

त्रिवेणी संगमावर काठी पूजा
पौष वैद्य अमावस्येला खानापूर, निरूळ, अहिरवाडी येथील कन्हैय्यालाल देवस्थानचा सुमारे 52 फुट उंचीच्या ध्वजस्तंभ (काठी) अजनाड येथील सूर्य कन्या तापी, नागोई, खळखळी या तिन्ही नद्यांच्या त्रिवेणी संगमावर ध्वजस्तंभास भगत व ग्रामस्थ येवून अभ्यंगस्नान घालतात. ध्वजस्तंभास नवीन वस्त्र परीधान केले जाते व ध्वज फडकविण्यात येतो. या दिवशी अजनाड, ता. रावेर येथे मोठ्या उत्साहात यात्रोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी भक्तगण खानापूरात घरोघरी फिरून काठीचे दर्शन घेतात.

बाटीचा भाविकांना प्रसाद
माघ शुद्ध प्रतिपदेला खानापूर, निरूळ, अहिरवाडी, कर्जोद, निंभोरासीम येथे यात्रोत्सव साजरा केला जातो. सर्व ग्रामस्थ कानिफनाथ महाराजांच्या गादीचे दर्शन घेऊन रिद्धी-सिद्धी प्राप्त असलेले पानगे (बाटी) तयार करून भाजतात. मंदिराच्या आवारात पूजा-पत्री, खेळणे, मिठाई यांची दुकाने थाटलेली जातात. दिवसभर नवस फेडणार्‍यांची व दर्शन घेणार्‍यांची गर्दी असते. याचे हे प्रमुख वैशिष्ट्य असते. सायंकाळी सर्व भगत वृंद भाविक ग्रामस्थांसह सवाद्य मिरवणुकीद्वारे बस थांब्यावरील भक्तांच्या समाधी स्थावरील समाध्यांचे दर्शन घेवून पंच आरती लावल्यानंतर गावातून प्रमुख मार्गाने भक्त गणांसह ढोल, बासरी व तुतारीच्या सवाद्य आवाजात कन्हैय्यालाल महाराज यांच्या नामाच्या गजरात मिरवणूक काढतात. यानंतर मंदिराच्या आवारात सुमारे 200 ते 300 फूट लांब 15 ते 20 फूट उंच अशा 5-5 फूट अंतरावर लोखंडी साखळीत गेंद अडकवले जातात. त्यानंतर वाद्याच्या तालावर भक्तगण गेंदाच्या रिंगणात नृत्य सादर करतात. हे यात्रेचे प्रमुख आकर्षण असते.

महाप्रसाद व भंडार्‍यासाठी भाविकांना आयोजकांचे आवाहन
यात्रेकरू व ग्रामस्थांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचा (भंडार्‍याचा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून लाभ घेण्याचे आयोजकांनी कळवले आहे. पाचपावली व धर्मबीज सोहळा- माघ शु.द्वितीयेस धर्मबीजचे औचित्य साधून श्री धर्मनाथाचे शक्तीस्थळ असलेल्या चोरवड शिवारातील पाचपावली येथे आहे. येथे भक्तगण जावून त्या समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेतात व याच कार्यक्रमाने यात्रेची सांगता होते. यात्रेच्या यशस्वीतेसाठी कन्हैय्यालाल देवस्थानचे सर्व कार्यकारी समिती ग्रामपंचायत प्रशासन विविध सार्वजनिक मंडळे, ग्रामस्थ परीश्रम घेत आहेत.