लोणावळा :-शहरातील जागृत देवस्थान असलेल्या भुशी तलावातील ओम चैतन्य कानिफनाथ मठात आज रंगपंचमी उत्सवानिमित्त कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उत्सवाचे हे 53 वे वर्ष होते. कानिफनाथ उत्सवानिमित्त सोमवार ते मंगळवार असे चोवीस तास नाथ ग्रंथाचे अखंड पारायण करण्यात आले.
हजारो भाविकांची गर्दी
आज(दि.7) पहाटे नवनाथ ग्रंथ पूजन, काकडा आरती, ध्वजारोहन, कलश पूजन, अभिषेक, होम हवन, आरती असे धार्मिक कार्यक्रम दुपारपर्यंत पार पडले. यावेळी महाराजांच्या दर्शनाकरिता व वनभोजनाकरिता हजारो भाविकांनी गर्दी केल्याने भुशीच्या तलावाला यात्रेचे स्वरुप आले होते. मोतीराम रावजी मराठे हे या मठाचे अध्यक्ष असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सदर उत्सवाचे सालाबादप्रमाणे आयोजन करण्यात येते.
सदाशिव हुलावळे, नगरसेवक माणिक मराठे, रतन मराठे, नारायण पवार, रामजी मराठे हे कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी आहेत. लोणावळा शहर व पंचक्रोशीतील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोणावळा नगरपरिषदेचा अधिकारी वर्ग, नाथपंथीय भक्त मंडळी व नागरिक यांनी उपस्थिती लावली होती. दुपारनंतर मठात श्री सटवाई सेवा तरुण मंडळ व श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ शंकर चिले भजनी मंडळ यांनी भजने तर हभप उमेश महाराज शिंदे यांचे प्रवचन झाले.