पुणे जिल्हा परिषदेचा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार पटकाविला
राजगुरूनगर : पुणे जिल्हा परिषदेचा ’आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खेड तालुक्यातील कान्हेवाडी बुद्रुकचे ग्रामसेवक नीलेश करू पांडे यांना ग्रामसेवक मासिक बैठकीत सन्मानित करण्यात आले. राजगुरूनगर येथील खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृह येथे पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप कोहिणकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, पुणे जिल्हा परिषद ग्रामसेवक पतसंस्था उपाध्यक्ष शंकर ढोरे, विस्तार अधिकारी बाळासाहेब ओव्हळ, खेड ग्रामसेवक संघटनेचे देवदत्त सांडभोर, रवींद्र गोसावी, जगन्नाथ जगदाळे, राजाराम रणपिसे, भाऊसाहेब वणवे, छाया इरणक, माधुरी झेंडे, रुपाली मलघे, सुदाम कड, मारुती देवाडे, सारिका टाकळकर उपस्थित होते.
गावाच्या विकासात योगदान
नीलेश पांडे हे ग्रामपंचायत कान्हेवाडी बुद्रूक येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी हागणदारीमुक्त गाव, वृक्षारोपण, वैयक्तिक लाभाच्या योजना, दलित वस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा योजना, घरकुल योजना आदी योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासकामांत भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सरपंच गंगुबाई आंबेकर, उपसरपंच मारुती सहाणे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.