तळेगाव : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कान्हे फाटा येथे गाडी वळवत असताना शेजारून जाणा-या ट्रेलरला धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. ट्रेलर चालकाला वडगाव पोलिसांनी अटक केली. दत्तात्रय गंगाराम देशमाने (वय 46, रा. नांदूर पठार ता.पारनेर जि. अहमदनगर), असे अटक केलेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. तर अक्षय सुरेश ओव्हाळ (वय 22, रा. राहुलनगर, नायगाव ता.मावळ), असे तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ओव्हाळ हा त्याच्या (एम एच 14 एफ व्ही 4315) क्रमांकाच्या दुचाकीवरून कान्हे फाटा येथून वळत असताना पुणे बाजूला जाणार्या (एम एच 06 के 4725) क्रमांकाच्या ट्रेलरची जोरात धडक बसून अपघात झाला. यात अक्षयच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अक्षय हा मावळातील शिरोता येथील वनपरिक्षेत्र वनमजूर सुरेश ओव्हाळ यांचा मुलगा असून त्याच्यामागे आई, वडील, बहीण व लहान भाऊ असा परिवार आहे. यापकरणी वडगाव मावळ पोलीस अधिक तपास करत आहेत.