धुळे- धुळे तालुक्यातील कापडणे गावातील झेंडा चौकातील रहिवासी योगेश चौधरी यांच्या दोन्ही मुलींना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झेंडा चौकातील माहेश्वरी योगेश चौधरी (12) तसेच तन्वी योगेश चौधरी (2) या दोन्ही सख्ख्या बहिणींना डेंग्यू आजाराची लागण झाली आहे. तापाने फणफणल्या आहेत. त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात तातडीचे उपचार सुरु आहेत. त्यांच्यासह यश भुषण पाटील 8वर्ष, रा. माळीवाड्यातील एक रुग्णास असे एकुण चार रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. यश पाटील यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तो आजच घरी परतला असून त्याची प्रकृती बरी आहे. गावात महिन्यापासून डेंग्यू आराजाने थैमान माजविले आहे. मात्र येथील आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप असून स्थानिक ग्रामस्थ कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुस्त कारभारावर नाराज आहेत.