भिवंडी | कच्च्या यार्नपासून तयार कापडापर्यंतच्या प्रक्रियेवर आकारण्यात आलेला 18 टक्के वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्यात आली असून, आता केवळ 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भिवंडीतील पॉवरलूम उद्योगाला दिलासा मिळाला आहे. या संदर्भात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळ्याचे खासदार सुभाष भामरे आणि भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
तयार कापडावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात आल्यामुळे पॉवरलूम उद्योग संकटात सापडला होता. भिवंडी शहराची यंत्रमाग नगरी अशी ओळख असून, राज्यातील धुळे व इचलकरंजीतही मोठ्या संख्येने पॉवरलूम आहेत. गेल्या काही वर्षांपासून चीनी बनावटीच्या कापडामुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आहे. त्यातच विजेचे वाढते दर, यार्नचे भाव आदींमुळे उद्योजक मेटाकुटीला आले होते. त्यातच जीएसटी लागू झाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन दिले होते. त्यात कापडावरील जीएसटी 18 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात होता.
अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कापडावरील जीएसटीत कपात करुन तो 18 टक्क्यांवरुन पाच टक्के केला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आल्यामुळे, भिवंडीसह देशभरातील यंत्रमाग व्यावसायिकांना दिला मिळाला आहे.