सजग नागरिक मंचची मागणी : प्रशासनाच्या धोरणाला हरताळ
पुणे : महापालिकेने कापडी पिशव्या खरेदीच्या निविदा तातडीने रद्द कराव्या अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने कापडी पिशव्या आणि बकेट याची यापुढे खरेदी न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अंतिम निर्णय अजून प्रलंबित असताना पालिकेच्या प्रशासनाने सोमवार (दि.28) वर्तमानपत्रात जाहिरात देऊन कापडी पिशव्यांसाठी निविदा मागविल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 25मध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यासाठी 9 लाख 99 हजार 983 रुपयांच्या निविदा मागविल्या आहेत. मध्यवर्ती भांडार विभागाने या निविदा मागविल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या धोरणाला हरताळ फासण्याचा हा प्रकार असल्याने या निविदा ताबडतोब रद्द कराव्या असे मंचने पत्रात म्हटले आहे.
10 लाखांपेक्षा फक्त 17 रुपये
कमी किमतीच्या निविदा दहा लाख किमतीच्यापेक्षा अधिक किमतीच्या निविदा मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविणे बंधनकारक असते. ते टाळण्यासाठी जाणूनबुजून दहा लाख रुपयांपेक्षा फक्त 17 रुपये कमी किमतीच्या निविदा काढण्यात आल्या. ही बाब गंभीर असून दक्षता विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मंच तर्फे करण्यात आली आहे.