कापडी पिशव्यांच्या वाटपातून रोखले प्लॅस्टीक प्रदूषण

0

नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक

भुसावळ- प्लॅस्टीक कॅरीबॅगवर बंदी असलीतरी नागरीकांकडून त्याचा होणारा सर्रास वापर व प्लॅस्टीकमुळे होणारे प्रदूषण पाहता नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर यांनी शहरवासीयांना कापडी पिशव्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. पर्यावरणाविषयी असणारी आस्था व शहर स्वच्छतेची त्यांच्यातील तळमळ नागरीकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. शहरातील नाल्यांमध्ये आजघडीला सर्वाधिक प्लॅस्टीक कॅरीबॅग अडकल्याची डोकेदुखी आहे तर प्लॅस्टीक कॅरीबॅग जनावरांच्या पोटात गेल्यानंतर त्याचे होणारे दुष्पपरीणाम नगरसेवक ठाकूर लोकांना समजावून सांगत आहेत. स्व-खर्चातून त्यांनी आतापर्यंत 600 वर कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. प्रभागातील नागरीकांसह आठवडे बाजाराच्या दिवशी ते ग्राहकांपर्यंत जावून कापडी पिशव्या वापरण्याचा आग्रह धरीत आहे शिवाय विक्रेत्यांनाही प्लॅस्टीक पिशव्या ग्राहकांना देऊ नये याबाबत आवाहन करीत आहेत.

पर्यावरण हानी टाळण्यासाठी पुढाकार
प्लॅस्टीक पिशव्यांच्या दुष्पपरीणासोबतच नियमित वापरात येणारे प्लॅस्टीकचे चहाचे कप, ग्लासचा वापरही नागरीकांना थांबावा, असे आवाहन नगरसेवक ठाकूर यांनी केले आहे. शासनाने आधीच प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणली आहे त्यामुळे नागरीकांनीही त्याचे दुष्पपरीणाम लक्षात घेता कॅरीबॅगचा वापर थांबवावा व पर्यावरणाची हानी टाळावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. शहरात प्लॅस्टीक बंदी असलीतरी पालिका प्रशासनाकडून कारवाईबाबत एकूणच असलेली अनास्था पाहता सत्ताधारी नगरसेवकाने पर्यावरणाविषयी दाखवलेली चिंता व राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे भुसावळवासीयांनी कौतुक केले आहे.