कापडे बुद्रूक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला अनेक नागरिकांना चावा!

0

पोलादपूर । तालुक्यातील कापडे बुद्रूक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील अनेकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने जोरदार चावे घेत घायाळ केल्याची घटना मंगळवारी सकाळी एका मोकाट बेवारशी कुत्र्याने काहींना चावा घेतल्यानंतर कापडे परिसरात एकच खळबळ उडाली. चाव्याने जखमी झालेल्या रुग्णांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ग्रामस्थांनी पोहोचविल्यानंतर सर्व रुग्णांना महाड येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाबाहेरची कापडे ग्रामस्थांची गर्दी पांगली तरी महाडला श्‍वानदंशरुग्ण पाठवण्याचा निर्णय का घेण्यात आला, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रूक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील एका वृध्देसहित सहा ग्रामस्थांना एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने जोरदार चावे घेतले. यानंतर ग्रामस्थांनी जखमी श्‍वानदंश रुग्णांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता तेथे प्राथमिक तपासणीनंतर एका वृध्देसहित सहा रूग्णांना महाड येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. यावेळी जमलेला कापडेवासीय ग्रामस्थांचा जनसमुदाय या कृतीनंतर लगेचच पांगला. परंतु, महाड येथे पाठविलेल्या श्‍वानदंश रूग्णांवरील उपचारासाठी रेबीज प्रतिबंधक औषधे पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयामधून कापडे बुद्रूक ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच अजय सलागरे यांच्याहस्ते महाडला पाठविण्यात आल्यानंतर औषधी असताना रूग्णांना महाडला का पाठवले, अशी संभ्रमावस्था रूग्णांच्या नातेवाइकांमध्ये पसरली. यावेळी दोन रूग्ण पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उपचार घेत आहेत.

महाड ट्रॉमाकेअर सेंटरमध्ये हलवलेल्या श्‍वानदंश रुग्णांमध्ये विहान देवेंद्र साने (वय 5), राहुल राजेंद्र जंगम (वय 20), सरस्वती कृष्णा जंगम (वय 85) नम्रता राजाराम कदम (वय 50) आणि धोंडीराम कदम (वय70) आदींचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली असून यापैकी सरस्वती जंगम या वृध्देला मोठया प्रमाणावर कृत्र्याने चावे घेतल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती महाड येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून देण्यात आली. दुपारी कापडे गावातील काही तरुण या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेत असता एका तरुणावर झडप घेत कुत्र्याने चावा घेतल्याने श्‍वानदंश रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे. दरम्यान, त्या कुत्र्याला संतप्त कापडेवासीयांनी ठार
मारल्याची माहिती प्राप्त झाली आहे.