नवी दिल्ली-केंद्र सरकारने कापड उद्योगातील विविध उत्पादनांवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. यामध्ये कपडे, रुमाल, उपरणी, स्कार्फ, कार्पेट अशा उत्पादनांचा समावेश आहे. मेक इन इंडियातंर्गत देशातंर्गत उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढीचा निर्णय जाहीर केला. कापड उद्योगातील एकूण ३२ वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्यात आले आहे.
अलीकडेच केंद्र सरकारने मोबाइल फोन, खेळणी आणि टीव्हीवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. आयात महाग केल्यामुळे स्थानिक कापड उद्योजकांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळणार आहे. कापड उद्योगात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन वाढल्यास नव्या नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते असा केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
आयात शुल्क वाढवण्याच्या या निर्णयाचा भारतीय उद्योगाला फायदा होऊन मेक इन इंडियाला बळकटी मिळू शकते. या निर्णयाचा चीन, विएतनाम, टर्की, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांबरोबर होणाऱ्या कापड व्यापारावर परिणाम होणार आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या व्यापार करारामुळे आयात शुल्क वाढीच्या या निर्णयातून श्रीलंकेला काही प्रमाणात सवलत मिळू शकते.
परदेशी कंपन्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. काही परदेशी कंपन्या त्यांच्या उत्पादनांची निर्मिती भारतामध्येच करतात. परदेशातील कपडयांच्या बडया ब्रॅण्डसनी भारतातील अनेक शहरांमध्ये दुकाने सुरु केली आहेत. आयात शुल्क वाढीमुळे कपडयांच्या किंमती वाढतील त्याचा परिणाम खरेदीवर होईल असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.