दरवाढीच्या प्रतीक्षेत अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांकडे पन्नास टक्क्यांवर कापूस पडून
अकोला : कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे 50 टक्केवर कापूस पडून आहे. सोमवारी जिल्ह्यात प्रतिक्विंटल 5,450 रुपयापर्यंत दर होते. यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी दर मिळत नसल्याने मुख्यत्वे कापूस उत्पादकांसह कोरडवाहू क्षेत्रात इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहे.
उशिरा खरेदी केंद्र
आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासनाने यावर्षी उशिरा खरेदी केंद्र सुरू केली. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच कापूस विकावा लागतो. यावर्षी बऱ्यापैकी उत्पादन झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे; पण जवळपास 50 टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच पडून आहे. मागील दोन वर्षे कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याने मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी प्रंचड आर्थिक अडचणीत सापडला होता. म्हणूनच यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळतील, अशी आशा होती; परंतु दर सुधारले नाहीत. सुरुवातीला बऱ्यापैकी म्हणजे 6 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कापसाचे दर गेले होते. तथापि,यावेळी कापसाची वेचणी सुरू होती; तसेच त्यामध्ये आर्द्रताही होती. तुरळक शेतकऱ्यांनी त्यावेळी कापूस विकला; पण त्यानंतर दर कोसळले ते आजतागायत सुधारले नाहीत.