कापसाचे पीक गेल्यामुळे शेतकरी हताश

0

चाळीसगाव । ग्रामीण अर्थकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या कापसाला पहिलेच बोंडअळी लागल्याने अर्थचक्र संकटात सापडले असतांना नागद रोड स्थित परिसरात असलेल्या शाम देशमुख यांना मात्र या दुष्टचक्राचा सामना करावा लागला आहे. कापसाची लागवड करण्यात आलेल्या एकूण क्षेत्रांपैकी 20 ते 30 टक्के क्षेत्रावरील पिक अज्ञात इसमाने रात्रीतून उपटून फेकल्याने जवळपास एक ते दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शाम देशमुख यांनी तीन हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली असून बोंड येण्यास सुरुवात होताच सुमारे 2 हजार कापसाची रोपटी उखडून फेकल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शाम देशमुख यांनी नेहमीप्रमाणेच अपेक्षा ठेवून मोठ्या आशेने खरिपाच्या हंगामाची लागवड केली होती, परंतु सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. यावर्षी पुन्हा एकदा बळीराजाचा ‘बळी’ गेल्याने शेतकरीवर्गात चिंतेचा विषय राहिला आहे.