कृउबा सचिवांसह पोलिस प्रशासनाला शेतकरी संघटनेचे निवेदन
बोदवड- दोनशे रुपये जास्तीचा भाव देवून तालुक्यातील वरखेड येथील कापूस उत्पादकांना गंडवू पाहणार्या जामनेर तालुक्यातील व्यापारयांचा डाव सतर्क शेतकर्यांनी उघडा पाडल्यानंतर पोलिसात धाव घेतली मात्र आरोपींवर गुन्हा दाखल न करता मध्यस्थी झाल्याने दोषी व्यापार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे पोलिस प्रशासन व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना करण्यात आली.
शेतकर्यांच्या सतर्कतेने फसवणुकीचा डाव फसला
कापसाला पाच हजार 300 रुपये भाव दिला जात असताना जामनेर तालुक्याील कालू शेठ, सत्तार शेख, रीयाज शेख या व्यापार्यांनी तालुक्यातील वरखेडच्या शेतकर्यांना या भावापेक्षा प्रत्येकी क्विंटलमागे 200 रुपये जादा भाव देण्याचे आमिष देत गावातील शेतकर्यांकडील कापसाची मोजणी केली. मात्र व्यापार्याच्या काट्यात झोल असल्याचा संशय निवृत्ती वसंत चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व्यापारी व मापाडीत हुज्जत घातल्याने शेतकरीही संतप्त झाले. चौधरी यांनी यापूर्वीच आपला कापूस मोजल्याने ते वजन व्यापार्यांकडे मोजण्यात आल्यानंतर आलेल्या वजनात तफावत आढळल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले होते. 40 किलोच्या मापात तब्बल आठ किलो झोल होत असल्याने शेतकर्यांची झालेली फसवणूक निंदणीय असून व्यापार्यांच्या हमाल व मापारीला पोलिस स्थानकात आणल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही शिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांसह कर्मचार्यांचे पथक घटनास्थलळी पोहोचल्यानंतरही संबंधीत व्यापारी परवानाधारक आहे की नाही याची खातर जमा न करता ताब्यातील संशयीतांना सोडण्यात आले, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
राजकीय हस्तक्षेपाने टळला गुन्हा
शेतकरी संघटनेच्या निवेदनानुसार गुन्हा दाखल न होण्यासाठी राजकारण्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने फौजदारी गुन्हा दाखल होवूशकला नाही त्यामुळे संशयीत सुटले मात्र दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नायब तहसीलदार बी.डी.वाडीले यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनाला संभाजी ब्रिगेड, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, नाभिक समाज संघटना, पत्रकार तालुका संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदना देताना शेतकरी संघटणेचे जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनिल वराडे, संतोष पाटील, अनंता वाघ, ईश्वर लिधुरे, प्रवीण मोरे, राहुल वाघ, नाना पाटील, राजेंद्र चौधरी, विजय चौधरी, आनंदा पाटील, राकेश बोरसे इत्यादी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते
उपस्थित होते. दरम्यान, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजु काळबैले यांनी महाराष्ट्र कृषी खरेदी-विक्री नियम अधिनियम 1963/1967 कलम सहा नुसार संबंधीत व्यापार्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सभापती निवृत्ती पाटील यांनीदेखील विना परवाना व्यापारी धारकावर कार्यवाही होणारच, असे ते म्हणाले.