जळगाव – जिल्ह्यात कापूस खरेदीला पुन्हा सुरवात झाली असून बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी किंवा व्यापारी जिल्ह्यात येऊन कापसाची विक्री करू नये म्हणून जिल्हा बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. दरम्यान बाहेरून कोणी कापूस विक्रीसाठी येऊ नये ह्याची दक्षता घेण्याची जबादारी पोलीस अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय कपास निगम लि व राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत कापूस खरेदी बंद होती. लॉकडाऊनमुळे त्याचा फटका कापूस उत्पादक शेतकर्यांना सहन करावा लागत होता. मात्र पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात बैठक घेतली. दि. २२ मे अखेर जिल्ह्यात ४८ हजार ३९१ कापूस उत्पादक शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ८९३ शेतकर्यांनीच कापसाची विक्री केली आहे. अद्याप ४३ हजार ४९८ शेतकर्यांचा कापूस विक्री होणे बाकी आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव बाजारमुल्यापेक्षा अधिक असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी हे जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी येऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून जिल्ह्यात कापसासाठी बंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. तसेच पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्ट नेमून बाहेरून व्यापारी किंवा शेतकरी कापूस विक्रीसाठी येणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
Prev Post