शिरपूर । येथील प्रियदर्शनी शेतकरी सहकारी सूतगिरणीत कापूस उत्पादक शेतकर्यांचे पैसे ठेव म्हणून ठेवून घेतले असून तब्बल 15 ते 20 वर्षे होवूनही शेतकर्यांना ठेवी परत केल्या जात नसल्याने भाजपचे वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेवून सहकार मंत्र्यांनी धुळे जिल्हा उपनिबंधक यांना योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले.
आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत आमदांरानी केली टाळाटाळ
यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती बँकेने शिरपूर साखर कारखान्याला कामकाजास बंदी केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी ऊसाऐवजी कापूस लागवडीकडे वळाला . हा सर्व कापूस खाजगी व्यापार्याला विकण्यापेक्षा तालुक्यात असलेल्या प्रियदर्शनी शेतकरी सहकारी सूतगिरणीला देण्यात आला. कापूस विक्रीनंतर सूतगिरणीने शेतकर्यांना त्यांचे पुर्ण पैसे न देता त्यातील काही रक्कम ठेव म्हणून ठेवून घेतली. या ठेवीवर बँकेपेक्षा जास्त व्याज देण्याचे आमिषही दाखविण्यात आले. तथापी अनेक वर्षे होवून शेतकर्यांना ना त्यांचा पैसा मिळाला, ना व्याज. त्यामुळे शेतकर्यांनी आ.अमरिषभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्याकडे व्यथा मांडल्या. तथापी सूतगिरणीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत या रकमा परत करण्यास टाळाटाळ होवू लागली. त्यामुळे शेतकर्यांनी भाजपचे वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्याकडे कैफियत मांडली. डॉक्टरांनी लगेचच मुंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेवून शेतकर्यांची बाजू मांडली. सहकार मंत्री ना.देशमुख यांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने जिल्हा उपनिबंधक धुळे यांना योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेतकर्यांनी सूतगिरणीत ठेवलेल्या ठेवी संदर्भातील कागदपत्रे जिल्हा उपनिबंधकाकडे सादर करावीत असे आवाहन डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी केले आहे