कापूस खरेदीस प्रतिसाद मिळेना

0

भुसावळ । तालुक्यातील चोरवड येथील केंद्र्रावर कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. बाजार समिती सभापती सोपान भारंबे यांच्या हस्ते तोलकाट्याच्या पूजनाने उद्घाटन करण्यात आले. यानंतर शेतकर्‍यांनी आणलेलज्ञा कापूस 4 हजार 320 रुपये हमीभावाने खरेदी करण्यात आला. यावेळी केवळ उद्घाटनापुरते कापसाची खरेदी झाली. शासनाकडून अपेक्षेप्रमाणे हमीभाव मिळत नसल्यामुळे कापूस विक्रीस शेतकरी फारसे प्रतिसाद देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्घाटन प्रसंगी बाजार समिती सचिव नितीन पाटील, सीसीआयचे केंद्रीय निरीक्षक महेश केटूकले, डॉ. राजेश जैन, नितीन जैन, बाजार समिती संचालक कैलास महाजन, कुर्‍हा सरपंच अण्णा शिंदे यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

पणन महासंघाची टाळाटाळ
जिल्ह्यात पणन महासंघाच्या केंद्रासाठी गेल्या महिन्यातच कापूस खरेदीची नोंदणी सुरु झाली होती. मात्र सीसीआय केंद्रावर तब्बल 24 दिवस उशिराने खरेदी सुरु करण्यात आली आहे. कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वी पणन महासंघाने सर्वच केंद्रांना शेतकर्‍यांच्या ऑनलाईन नाव नोंदणीसाठी 18 ऑक्टोबर रोजी आदेश दिले. त्याप्रमाणे सर्वच बाजार समितीत सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स मागितल्या होत्या. सर्वच बाजार समित्यांनी पणन महासंघाकडे कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र पणन महासंघ सीसीआय केंद्रांना सॉफ्टवेअर देण्यास टाळाटाळ करीत होते. ऑनलाईन प्रक्रिया होत नसल्यामुळे केंद्र संचालकांनी गेल्या वर्षीच्या पध्दतीने शेतकर्‍यांचा सातबारा उतारा व इतर कागदपत्रे घेऊन खरेदी सुरु केली आहे.

शेतकर्‍यांना सहा हजाराची अपेक्षा
यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीस भारत कापूस निगमतर्फे चोरवड येथील सुशिला जिनींगमधील केंद्रावर सभापती सोपान भारंबे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. मात्र शेतकर्‍यांना 6 हजार रुपये हमीभाव मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे 4 हजाराच्या भावात कापूस विक्रीसाठी शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते.

आजपासून ऑनलाईन नोंदणी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस शनिवारी ऑनलाईन नोंदणीचे सॉफ्टवेअर प्राप्त झाले असून सोमवारपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांंनी कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी खरीप हंगामातील पीक पेरा क्षेत्रानुसार सातबारा उताजयाची मूळ प्रत, होल्डींग, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी माहिती खरेदी पूर्वनोंदणीसाठी आवश्यक आहे.