जिल्हा बँक संचालक संजय पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगाव – संपूर्ण देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खानदेशातील शेतकऱ्यांच्या घरात कापूस, गहू, मका, हरभरा शासकीय खरेदीविना पडून आहे. तरी या संदर्भात त्वरित मार्ग काढावा अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने द्राक्ष, संत्री या फळबागांकडे लक्ष दिले आहे. खानदेशात कापूस,गहू, मका, हरभरा हे पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आजमितीला खानदेशातील शेतकऱ्याच्या घरात कापूस, गहू, मका, हरभरा पडून आहे. लॉकडाऊनमुळे शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने व शेतमाल घरात पडून असल्याने शेतकऱ्यांना घरात झोपायला देखील जागा नाही. फळबागाप्रमाणे कापूस, गहू, मका, हरभरा यांच्या शासकीय खरेदी बाबतही त्वरित मार्ग काढून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा अशी मागणी संजय पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.