कापूस विकून पैशासाठी शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडे भटकंती

0

जळगाव : नोटा बंदीच्या निर्णयाला एक महिने पुर्ण झाले असून शासनाने घेतलेल्या नोटा बंदीच्या आणि कॅशलेश प्रणालीच्या निर्णयानंतर रोख रकमेचा व्यवहार देखील कमी प्रमाणात होत आहे. शेतकर्‍यांनी विकलेल्या शेतीमालाचा व्यवहार चेकद्वारे होत असल्याचे शेतकर्‍यांना पैसे मिळविण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. सध्या कापसाचा हंगाम सुरु असुन शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्री करीत आहे. व्यापारी शेतकर्‍यांकडून कापुस खरेदी करीत आहे मात्र खरेदीच्या मोबदल्यात रोख रक्कम देत नसुन चेक देत आहे. त्यातच व्यापारी चेक देण्यासाठी आठ-दहा दिवसाचा कालावधी लावत असल्याने आणि बँकेद्वारे चेक वठविण्यासाठी जास्तीचा कालावधी लागत असल्याने पैशांसाठी शेतकर्‍यांची भटकंती होत आहे. सध्या राष्ट्रीयकृत बँकेत तुफान गर्दी असल्याने आणि त्यातच व्यापार्‍यांकडून खातेबाह्य बँकशाखेचे चेक दिले जात असल्याने चेकद्वारे पैसे मिळण्याला अधिकच विलंब होत आहे. शेतीमाल विकल्यानंतरही एक-एक महिने शेतकर्‍यांच्या हातात पैसे पडत नसल्याने बळीराजा नाराज झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कॅशलेश व्यवहारांमुळे बँकेतील गर्दी वाढली
नोटाबंदीच्या निर्णयानंतर शासनाने कॅशलेश व्यवहारावर अधिक भर दिला आहे. तसेच कॅशलेश व्यवहारांचे ग्रामीण भागात अधिक अमंलबजावणीसाठी विशेष प्रयत्न देखील करत आहे. कॅशलेश व्यवहार करण्यासाठी बँकेत पैसे असणे गरजेचे असल्याने पैसे भरण्यासाठी गर्दी वाढली आहे. शेतकर्‍यांना त्यांचे नित्यांचे काम सोडून तासन् तास बँकेत रांग लावून उभे रहावे लागत आहे.

शेतकर्‍याचे आर्थिक समिकरण बिघडले
शेती हंगाम असल्याने हा कालावधी आर्थिक उलाढालीचा असतो. या कालावधीतच आर्थिक देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात होत असते. शेतीमाल विक्रीनंतर लागलीच शेतकर्‍यांना पैसे मिळाल्यास शेतकरी आर्थिक व्यवहार सुरुळीत आणि वेळेवर होऊ शकते. परंतु चेकद्वारे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक समिकरण बिघडले आहे. पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने कर्ज भरणा लवकर होत नसून व्याजाच्या रकमेत वाढ होत आहे.