काबा, मदिना बंद होऊ शकतात तर भारतातील मशिदी का नाही : जावेद अख्तर

0

नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक धार्मिक स्थळंही बंद आहेत. परंतु काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. यावरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भारतातील मशिदीही बंद करण्याची मागणी केली आहे. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही, अशा आशयाचे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.


जावेद अख्तर यांच्या मागणीपूर्वी देवबंद स्थित दारूल उलूमचे मोहतमिम मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी उलूमच्या इमारतीला आयसोलेशन वॉर्ड करण्याची विनंती केली आहे. संकटाच्या काळात देवबंद दारूल अलूम देशातील नागरिक आणि सरकारसोबत आहे. दारूल उलूमची ग्रँड ट्रंक रोडनजीक एक इमारत आहे. आवश्यकता भासल्यास सरकार त्या इमारतीचा आयसोलेशन वॉर्ड म्हणून वापर करू शकते, असं त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता जावेद अख्तर यांनीही यावर भाष्य केले आहे. जो पर्यंत करोनाचं संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदने फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचे मी समर्थन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.