काबूलमधील स्फोटात 80 ठार 300 जखमी

0

काबूल । अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ आज सकाळी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात तिथल्या इमारतींचे नुकसान झाले असून सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. विविध देशांचे दुतावास असलेला वझीर अकबर खान परिसर बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हादरला. अफगाणीस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात जवळपास 80 जण ठार तर 300 जण जखमी झाले आहेत. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटांत अनेकजण मारले गेल्याची शक्यता आहे. भारतीय दुतावासातील सर्व अधिकारी मात्र सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. तसेच हल्लेखोरांच्या निशाण्यावर इराणचा दुतावास असल्याची माहिती मिळते आहे.

पंतप्रधांनाकडून तीव्र निषेध
स्पनेच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. काबूलमधील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. जखमींसाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी भारत अफगाणिस्तानसोबत आहे. दहशतवादाला पाठिंबा देणार्‍या शक्तींना हाणून पाडायला हवेफ, अशा शब्दात मोदी यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काचा फुटल्या दरवाजे उखडले
राजधानी काबूलजवळ झालेल्या स्फोटाची तीव्रता अतिशय जास्त आहे. स्फोटाच्या आवाजामुळे शंभर मीटरवरील घरांच्या काचा फुटल्या आहेत. यासोबतच घरांचे दरवाजेदेखील उखडले गेले आहेत. या स्फोटानंतर घटनास्थळी धुराचे लोट निर्माण झाले. या स्फोटामुळे भारतीय दुतावासाचेदेखील नुकसान झाले आहे.

भारतीय अधिकारी-कर्मचारी सुरक्षित
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून काबुलमधील भारतीय दुतावासातील अधिकारी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. अफगाणीस्थानच्या अधिकार्‍यांना शंका आहे की हल्लेखोरांनी कार बॉम्बने स्फोट घडवला आहे.

शनिवारी खोस्तमध्ये झाला होता स्फोट
शनिवारी अफगाणीस्थानच्या खोस्त शहरात दहशतवाद्यांनी कारमध्ये स्फोट घडवला होता. त्यात 18 जण मृत्यूमुखी पडले होते. या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली नव्हती. त्याच दिवशी देशातील दुसर्‍या एका भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 36 लोक मारले गेले होते.