‘कामकाज बंद’ने विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्याची झाली सुरुवात

0

मुंबई । अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून वाया गेला. त्यानंतर सलग 4 दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला. तरीही विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. भाजप, शिवसेेनेच्या सदस्यांसह विरोधकांनीही पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ घातला. ज्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडाही कामबंदनेच सुरु झाला.

विधानसभेत अध्यक्षांनी प्रश्‍नोत्तराची घोषणा करताच शिवसेना, भाजPoपच्या सदस्यांसह विरोधकांतील सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून घोषणाबाजी सुरू करत वेलमध्ये उतरायला सुरुवात केली. सदस्य वेलमध्ये उतरायच्या आधीच अध्यक्षांनी कामकाज अर्ध्या तासांसाठी स्थगित केले. यानंतर अवघ्या एका मिनिटात पुन्हा अर्ध्या तासांसाठी कामकाज तहकूब केले. विधान परिषदेतही जोवर शेतकर्‍यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा तासाभरासाठी तर दुसर्‍यांदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारा ठराव चर्चेविनाच मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज नियमित कामकाज सुरु होताच हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. संपूर्ण विधिमंडळ कर्जमाफीसाठी आग्रही असताना सरकार शेतकर्‍यांची फसवणूक करत आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी कोटींच्या योजना सरकार जाहीर करते मात्र, यामुळे शेतकरी किती सक्षम झाला याचा पुरावा सरकार का देत नाही, असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सरकार कर्जमाफीच्याबाबत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, अशी टीका केली. राज्यात हजारो रुपयांचे प्रकल्प आजही पारित होतात, मग शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी बैठका कशाला, असा सवाल राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मांडला. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

विधान परिषदेत सरकारचा चर्चेचा प्रस्ताव विरोधकांनी फेटाळला
शेतकर्‍यांची कर्जमाफी व्हावी, ही विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांचीही मागणी असल्याचे सांगत राज्य सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल आहे. मात्र, याचे नियोजन करून वेळ ठरवावी लागेल, यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक घेऊन व्यवहार्य निर्णय घेण्यात यावा, असा प्रस्ताव सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात मांडला. यावर सभापतींनी या बैठकीसाठी अनुकूल वेळेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यास सांगितले. सभागृहाच्या तहकुबीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर ही बैठक लगेचच घेण्यात यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळवल्याचे चंद्रकांत पाटील यांना सांगितले. मात्र, विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव अमान्य करत घोषणाबाजी सुरूच ठेवली.

विधानसभेत गोंधळात पुरवण्या मागण्या झाल्या मंजूर
मुख्यमंत्र्यांनी महाडचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पुन्हा गोंधळ सुरु झाला. या गोंधळातच पुरवणी मागण्या तसेच काही विधेयके मंजूर करण्यात आली. त्यानंतर सलग दोन वेळा सभागृह तहकूब झाल्यावर विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

शिवसेनेची हिंदी भाषेत घोषणाबाजी
शिवसेना आणि मराठी भाषेची अस्मितेचे एक वेगळे नाते आहे. मात्र आज शिवसेनेचे सदस्य चक्क हिंदी भाषेत लिहिलेले फलक घेऊन सभागृहात कर्जमाफीची मागणी करताना दिसले. ’ना करो किसानो से इतनी नाइंसाफी, किसानो को चाहिये सिर्फ कर्जमाफी!’ अशा आशयाचे फलक घेऊन सेनेचे आमदार वेलमध्ये उतरले होते.