मुंबई – विरोधकांची चर्चेची तयारी असतानादेखील कामकाज होऊ न दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. विरोधी पक्षांच्या आमदारांचा २९३ चा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे सुनिल केदार हे उभे राहिले होते. मात्र, यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले.
सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने लोकशाहीचा खून केला असून आमची सभागृहात चर्चा करायची तयारी असतानाही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले, असा आरोप विरोधकांनी केला. प्रस्तावाच्या वेळी सत्ताधारी आमदारांनीच गोंधळ घातला आणि या गोंधळात विधेयक मंजूर केले. त्यानंतर विरोधकांचा २९३ चा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चर्चा करण्याऐवजी पळ काढल्याचा आरोप करत सभागृहातच विरोधकांनी बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.