कामगारपुतळा झोपडपट्टीला ‘अच्छे दिन’

0

पुणे । पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामाच्या जागेवर मेट्रो स्टेशनचा समावेश असलेली बहुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी गोदामाच्या मागील बाजूस नदी पात्रापर्यंत असलेल्या कामगार पुतळा झोपडपट्टीचे स्थलांतर करून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यामुळे या झोपडपट्टीला लवकरच अच्छे दिन येणार आहेत. ‘महामेट्रो’ने या झोपडपट्टीचे सर्वेक्षण सुरू केले असून, त्याच्या पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी, महापालिका, ‘एसआरए’ आणि महामेट्रो’च्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रो रेल्वेचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर गौतम बिर्‍हाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेट्रो प्रकल्पासाठी शासकीय धान्य गोदामाची सुमारे अडीच हेक्टर जागा महामेट्रोच्या ताब्यात आली आहे. मेट्रो मार्गाचा विचार करता कामगार पुतळा आणि नदी लगतच्या झोपडपट्टयांतील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सोशल इम्पॅक्ट असेसमेंटच्या माध्यमातून झोपडपट्टीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, असे बिर्‍हाडे यांनी सांगितले.

पुनर्वसनावर तोडगा
वनाज-रामवाडी उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग हा धान्य गोदामापासून कामगार पुतळा झोपडपट्टीच्या मधून मुठा नदी ओलांडून पलिकडे जाणार आहे. तसेच पीएमआरडीएने शिवाजीनगर ते हडपसर आणि पुन्हा स्वारगेट, वडगाव बुद्रुक, वारजे आणि पुन्हा हिंजवडी अशा विस्तारीत मार्गाचे नियोजन केले आहे. यामुळे कामगार पुतळा झोपडपट्टी, नदीपात्रालगत असलेल्या राजीव गांधी झोपडपट्टीतील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे, त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

नदीपात्रात झोपड्या
कामगारपुतळा झोपडपट्टी परिसरात सुमारे 1200 झोपड्या आहेत. यापैकी काही झोपड्या या खाजगी मालकीच्या आणि सरकारी जागेवर असून काही झोपड्या नदीपात्रात बसविण्यात आल्या आहेत. या झोपड्यांमध्ये राहणार्‍या रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, एसआरएचे अधिकारी आणि महामेट्रोचे अधिकारी अशी संयुक्त बैठक घेण्याबाबतचा पत्र व्यवहार संबधित विभागांसोबत करण्यात आला आहे.

नळस्टॉप चौकात दुमजली उड्डाणपूल
वनाज ते रामनगर उन्नत मेट्रो मार्गाचे पिलर बांधणीचे काम जानेवारीमध्ये सुरू करण्यासाठी तयारी सुरू आहे. पुणे महापालिकेने नळ स्टॉप चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम महामेट्रो’ कंपनीकडे सोपविले आहे. एसएनडीटी लगतच्या लागू बंधू चौकापासून ते गरवारे महाविद्यालयाच्या अलिकडील पेट्रोलपंपापर्यंत सुमारे 550 मी. लांब आणि 12. 5 मी. रुंद दुमजली उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर वाहनांसाठी चार लेन असतील, तर दुसर्‍या मजल्यावर मेट्रो मार्ग असेल. या पुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून या कामासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी पुणे महापालिका आणि महामेट्रो प्रत्येकी 50 टक्के हिस्सा देणार आहे.

स्थानक होणार आकर्षक
पुणे मेट्रो रेल्वेच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, वनाज ते रामवाडी आणि पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे शिवाजीनगर धान्य गोदामाजवळ जंक्शन होणार आहे. याठिकाणी भुयारी आणि उन्नत असे दोन मेट्रो स्थानक असतील. त्यावर बहुमजली उंच इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये विविध कार्यालये, शॉपिंग मॉल तसेच न्यायालयही सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे मेट्रोमध्ये हे स्थानक संपूर्ण देशात आकर्षक करण्याचे नियोजन ‘महामेट्रो’ने केले आहे.