कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजप अपयशी : सबनीस

0

चिंचवड : सतेवर असलेले भाजप सरकार कामगारांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या आणि प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. आज देशात कामगारांचे तसेच चतुर्थ श्रणीत काम करणार्‍याचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. सरकारने कामगारांची प्रतिष्ठा जपली पाहिजे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने 28 वी राज्यस्तरीय श्रम उद्योग परिषद चिंचवडला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील ऑटो क्ल्स्टर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन श्रीपाल सबनीस व उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, सुदाम भोरे, पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते. सबनीस म्हणाले, कामगारांच्या रक्ताला जात, धर्म, पक्ष नसतो. कामगार हा विविध जातीधर्माचा नसून त्याच्याबाबत सर्वांची बांधिलकी असली पाहिजे. आज अनेक ठिकाणी विविध मार्गाने कामगारांचे शोषण चालू आहे. मालकांचे पुढारीच कामगारांचे शोषण करतात. कामगाराच्या पैशावर मालकाच्या मांडीला मांडी लावून बसणारे भ्रष्ट नेते आज दिसू लागले आहेत. हे बंद झाले पाहिजे. अशा भ्रष्ट नेत्यापासून वेळीच सावध झाले पाहिजे. केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळावा एवढी कामगारांची माफक अपेक्षा असते. भारतातले कामगार विषयक कायदे हे चिंतन व चिंतनाचा विषय झाला आहे.