कामगारांच्या मागणीबाबत अल्फा लवाल उदासीन

0

पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील मे. अल्फा लवाल कंपनीतील 402 कामगारांनी पुन्हा शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. कामगारांचे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायप्रक्रियेला काही वेळ लागत असल्याने कंपनी प्रशासनाने कामावर येण्यास मनाई केलेल्या 402 कामगारांना न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आली.

प्रशासनाला मागण्यांचे निवेदन
कंपनी प्रशासनाने कंपनीतील 402 कामगारांना कंपनीमध्ये संघटना केल्याचा राग धरून 1 ऑक्टोबर, 2013 रोजी कामावर येण्यास मनाई केली. उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष काम करणा-या या कामगारांना कंपनी सेवेत कायम करावे अशी मागणी कामगारांनी केली होती. मागील चार वर्षांपासून कर्मचारी विविध मार्गाने कंपनी प्रशासनास विनंती करीत आहेत. परंतु कंपनीने त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने राहुल लांडगे, शेषेधर नाटेकर, सुभाष कानडे, महेंद्र चौगुले, आदित्य गावडे, माणिकराव जैत, संजय गोडोबे, धनंजय बारमुख यांच्या शिष्टमंडळाने कंपनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.

चर्चा झाली नाही
कामगारांच्या प्रश्नावर कंपनी प्रशासन दहा दिवसात सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे तीन ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, मात्र कंपनी प्रशासन कामगारांच्या हिताचा निर्णय न घेता उलट कामगारांनी कंपनीपासून 500 मीटरच्या परिसरात कोणतेही आंदोलन करू नये याबाबत कोर्टाकडून आदेश आणला आहे. तीन ऑगस्ट रोजी सर्व कामगार कामावर हजर होण्यासाठी कंपनी गेटवर गेले असता कंपनी प्रशासन अधिकारी ऋषिकेश विस्तूरीकर यांनी एच आर हेड बाहेरदेशात गेले आहेत. त्यांना परत येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील. ते परत आल्यानंतर त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून कामगारांना कामावर घेण्याचा निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन दिले होते. घटनेला 14 दिवस उलटून गेले तरी अद्याप कसलीही चर्चा करण्यात आली नाही.

खासगी बाऊंसर
कामगार आयुक्तांसमोर कंपनी प्रशासन आणि कामगार यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी पोलीस मध्यस्थी करणार असून लवकरच या चर्चेची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त असतानाही कंपनीने खासगी बाउंन्सर मागवले. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, तसेच शिस्तीचे पालन व्हावे यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना देखील कंपनी प्रशासनाने खाजगी बाउंसर कंपनी परिसरात तैनात केले होते. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. कंपनी प्रशासनाला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.