कामगारांसाठी रुग्णालय उभारणार

0

आळंदी । पावसाळी अधिवेशनातं खेड तालुक्याचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर शासनाने चाकण औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी 150 खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची ग्वाही दिली आहे. खेड तालुक्यातील चाकण परिसरातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्य सेवा तसेच उच्च दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी चाकण औद्योगिक क्षेत्रात राज्य कामगार विमा महामंडळा मार्फत 150 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव संमतीसाठी तसेच जमीन उपलब्धते साठी शासनास सादर केला असून शासना मार्फत रुग्णालय उभारणीस सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे या वेळी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी सांगितले. यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होणार असून शासन त्या साठीची सर्व आवश्यक कार्यवाही करत आहे असे उत्तर देण्यात आले. याशिवाय ग्रामीण भागाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे असणारे रस्ते,पाणी आणि वीज या विषयावर अधिवेशनात खेड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी अधिवेशनात सभागृहात खेड तालुक्याचा मागण्या मांडल्या.

दोन वर्षांपासून निधी मिळत नाही
यात रस्ते विकास बाबत ग्रामसडक योजना ही अतिशय चांगली योजना शासनाने आणली याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत मुख्य रस्त्यांना जोडणार्‍या वाड्या ,वस्त्यांचे रस्ते, तसेच पाणंद रस्ते करण्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. वर्दळीच्या रस्त्यांची दर्जाउन्नती करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण रस्ते,इतर जिल्हा मार्ग यांच्या निधीत वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

ड्युअल पंप संच गरजेचा

पिण्याच्या पाण्याबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने साठीचे निकष बदलण्याची आवश्यकता असून 2 वर्षांपासून या योजनेसाठी निधी मिळत नसूून निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. खेड तालुक्यात पाण्याचे स्रोत दूषित झाले असून कचरा निर्मूलनाची योग्य व्यवस्था करण्यात यावी.तालुक्यातील सर्व आदिवासी ठाकर वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठ्यासाठी ड्युअल पंप संच गरजेचा असून असे संच उपलब्ध करून दयावेत असे सांगितले.

वीज बाबतच्या प्रश्नात तालुक्यातील आदिवासी भागातील जुने विजेचे खांब तसेच डीपी ची कामे करण्याची आवश्यकता आहे. ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात यावी. तालुक्यातील वाडा, डेहणे, करंजविहिरे येथे वीज उपकेंद्रांना जागा तसेच निधी उपलब्ध करून द्यावा, असे विविध विषय मांडत खेड तालुक्यातील विकास कामला गती देण्याची मागणी केली.