पिंपरी : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने साधनसामग्री न पुरवल्याने मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी ठेकेदारास अटक केली आहे. ही घटना प्राधिकरण निगडी येथे बुधवारी (दि. 10) घडली. सुकेरा मंहतो (वय 50, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत कामगाराचे नाव आहे. ठेकेदार अजय जवाहर शर्मा (वय 48, रा. मोरेवस्ती, चिखली) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुनील ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे. निगडी येथे एका इमारतीचे काम शर्मा याने घेतले होते. शर्मा याच्याकडे मंहतो हे कामगार होते. तिसर्या मजल्यावर सेंट्रींगचे काम सुरू असताना तोल जाऊन मंहतो खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.