कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

0

मुक्ताईनगर । तालुक्यातील घोडसगाव शिवारातील मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्र.लि. येथील काही कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ काही कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असून काही कामगारांनी कारखान्याचे चेअरमन डॉ. शिवाजी जाधव यांना भेटून कामावर घेण्याची मागणी केली. तीन वर्षांपूर्वीच संत मुक्ताई साखर कारखान्याला विकत घेऊन मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जीचा मोठ्या गाजा वाज्यात मुख्यमंत्रांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात आली. त्यात काही हंगामी तर काही कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास बहुतांशी हंगामी कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या विषयावरून काही कामगारांनी कारखान्याचे चेअरमन डॉ. शिवाजी जाधव यांची भेट घेतली. त्यात रामनाथ धोबी, राजाराम पाटील, अंबालाल अहिरराव, संजय झांबरे, शरद सोनवणे, अंकुश पाटील, आशिष शेजोळे, राज गुप्ता यांचा सामावेश होता. याप्रसंगी खाजगी कारखाना असल्याने व ऊस नसल्याने पगार देणे परवडत नाही म्हणून कामगार कपात केल्याचे जाधव यांनी सांगितले असे एका कर्मचार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच एका कर्मचार्‍याने आमचे पगार व अनुभव दाखले अडकले असल्याने आमचे हात बांधले असल्याची हतबलता व्यक्त केली. कामावर न घेतल्यास कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.

कामगार कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ

कामगारांना कमी केल्यानंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी जवळपास 31 कायमस्वरूपी कामगारांना कमी करण्याचे आदेश साखरकारखाना प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांवर अक्षरशः उपासमारिची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत त्यांनाच राजीनामा देण्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर पुन्हा एक यादी कामगारांना कमी करण्याबाबत निघणार असल्याचे कळते.

कोणत्याही कर्मचार्यांचे वेतन थकलेले नसुन, आज 15 ते 20 कामगार माझ्याकडे आलेले होते. त्यांंनी त्यांंचा रजेचा पगार व ओव्हरटाईम या वेतनाबाबत चर्चा करुन माझ्याकडे मागणी केली मी तात्काळ संंबंंधीत कर्मचार्यास सांंगुन सदर वेतनाची रक्कम देण्यास सांंगितले. तसेच ज्या कर्मचार्यांंनी फंंडाची रक्कम मागणी केलेली आहे, त्या कर्मचार्यांंना तुम्ही राजीनामा दिल्यावरच ती रक्कम मिळेल असे सांंगितले. तसेच जे ब्रेक दिलेले हंंगामी कर्मचारी आहेत त्यांंना पुढच्या हंंगामात कामावर परत घेण्यात येईल असे डॉॅ. शिवाजी जाधव, चेअरमन, मुक्ताई शुगर एनर्जी प्रा.लि. यांनी सांगितले.