कामगार चळवळीचे आधारस्तंभ

0

प्रत्येक राज्याची व देशाची जडणघडण ही त्या ठिकाणच्या कामगारांमुळेच होत असते. केवळ औद्योगिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक तसेच संबंधित अनेक बाबींचा विकास हा कामगारांमुळेच होत असतो. या कामगारांचे हित जोपासत या चळवळीला बळकटी आणण्यासाठी अनेक नेत्यांनी परिश्रम घेतले. त्यात अण्णासाहेब देसाई यांचेदेखील योगदान मोलाचे आहे. आज या चळवळी इतिहासजमा होण्याची भीती असतानाच आणि बदलत्या कामगार कायद्यांची आव्हानं संघटनांपुढे असतानाही त्या टिकवणे आणि पितृतुल्य भावनेतून दोन्ही बाजूंनी अत्यंत जबाबदारीने समन्वय साधून कार्य करण्याची वृत्ती त्यांनी जोपासली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिपूर गावातून मुंबईला आल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला तो आजतागायत. सुमारे 20 हून अधिक संघटनांचा ते कारभार पहात आहेत.

भारतीय मजदूर संघाशी संलग्न राहिल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांचे कार्य सुरू झाले. त्यातून त्यांच्यातील नेतृत्वाला वाव मिळत गेला आणि कामगार चळवळीला त्यांच्या रुपाने एक वेगळे व बलशाली नेतृत्व मिळाले. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड हे त्याचे स्पष्टीकरण आहे. राज्यात सुमारे 33 हजार कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. वीजकायदा, खासगीकरण, घाईगडबडीत विद्युत महामंडळाचे विभाजन करूनही वीज उत्पादनात भर पडली नव्हती. नियोजित प्रकल्प पूर्ण होत नाहीत. सिंगल फेज पुरवण्याच्या माध्यमातून अप्रत्यक्ष वीज नाकारण्याचा प्रकार अशा कठीण परिस्थितीत वीज कामगारांचे रोजगार वाचवणे, वीजग्राहकांवरील अन्याय दूर करणे तसेच प्रकल्पांनादेखील चालना देण्याची सचोटी अण्णासाहेबांनी अवलंबिली आणि विद्युत क्षेत्राला दिलासा देण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून झाले. भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, भारतीय टॅक्सी संघ, भारतीय पत्रकार संघ, चित्रपट उद्योग, मुंबई मजदूर संघ, ग्रंथालय कर्मचारी संघ, घरेलू कमगार संघ, सुरक्षारक्षक संघ अशा अनेक संघटनाचे अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. घरेलू व बांधकाम कामगारांच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यास सक्रीय सहभाग राहिला आहे. त्याचबरोबर विद्युत मंडळातील 40 हजाराहून अधिक रोजंदार व तात्पुरत्या स्वरूपाच्या कामगारांना कायमस्वरुपी रोजगार देण्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. वीज कामगार कल्याण निधीच्या माध्यमातून 1300 सदस्यांना सुमारे 1.25 कोटी रुपयांची मदत त्यांनी मिळवून दिली आहे.

वीज उद्योगात अंतर्गत सुधारणा कमिटीचा मार्च 2003 मध्ये वीज प्रशासन व कामगार संघटनांमध्ये ऐतिहासिक करार करून घेतला. उल्हासनगर येथील शासकीय मुलांच्या बालगृह समन्वय समितीचे अध्यक्ष, दूरदर्शन व इतर चॅनेल्स स्ट्रिंगर न्यूज कॅमेरामन महासंघाचे उपाध्यक्ष, देसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, हनुमान व्यवस्थापक मंडळाचे सस्थापक, जिजाऊ बाल विकास मंदिराचे संचालक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचे व केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्डाचे सल्लागार व छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अशा जबाबदार्‍यादेखील ते सांभाळत आहे. वयाच्या 75 वर्षांनंतरही ते अविरतपणे काम करत आहेत. त्यांच्यासारख्या सत्शील, तात्विक विचारसरणीतून कार्य करणार्‍या कामगार नेतृत्वाला अभिवादन.