शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवा चेहरा म्हणून पर्याय
शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होईल अशी राजकीय वर्तुळात अटकळ
पिंपर-चिंचवड (बापू जगदाळे) : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघात राजकीय वारे घोंघावू लागले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेतेमंडळींनी गोळाबेरीज करायला सुरुवात केली असतानाच आता शिवसेनेकडूनही नव्या चेहर्याला संधी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद हा नवा चेहरा भोसरीच्या राजकारणात ताकदीचा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे शिवसेनेकडून इरफान सय्यद यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
संघटनेच्या छताखाली 17 हजार कामगार
भोसरी विधानसभा मतदार संघात राज्यभरातून आलेल्या कामगारवर्गाची संख्या जास्त आहे. उद्योगनगरीत काम करणार्या कष्टकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सय्यद यांनी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे स्थापना केली. आज सुमारे 17 हजार कामगार या संघटनेच्या छताखाली आले आहेत. कामगारांचे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याशिवाय कामगार हितासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेची ताकद वाढली आहे. या ताकदीवर शिवसेना सय्यद यांना उमेदवारी देऊन भोसरी मतदार संघाचा गड जिंकू शकते.
राजकारणात सशक्त पर्याय
मतदार संघात मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. शिवाय सय्यद हे कामगारांचे नेते असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे विविध जातीधर्मातील हजारो कामगारांचे पाठबळ आहे. हाच कामगारवर्ग मतदानाला मोठ्या संख्येने बाहेर पडतो. शिवसेनेला भोसरी मतदार संघावर विजयाचा झेंडा फडकविण्यासाठी सय्यद हा सशक्त पर्याय ठरू शकतात. त्यामुळे खासदार राऊत हे इरफान सय्यद यांना संधी देऊ शकतात, अशी चर्चा आहे.
बहुजनांचे नेते म्हणून ओळख
सय्यद यांनी कामगार हितासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे स्थापना केली आहे. माथाडी, मापाडी, वाहतूक अशा क्षेत्रात काम करणारे विविध जातीधर्माचे जवळपास 17 हजार कामगार या संघटनेशी जोडले गेले आहेत. संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी ते लढत आहेत. बहुजनांचे नेते म्हणून इरफान सय्यद यांची ओळख निर्माण झाली आहे. या बरोबरच हजारो तरूणांचा सर्वपक्षीय समावेश फौज-फाटा देखील त्यांच्याकडे आल्यामुळे याचा फायदा शिवसेनेला निवडणुकीत होऊ शकतो.
लोकसभेसाठीही होईल मदत
पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र मजदूर संघटनेची पाळेमुळे सर्वदूर पोहोचली आहेत. पिंपरी चिंचवडसह चाकण, मंचर, नारायणगाव, रांजणगाव, तळेगाव, मावळ, शिरुर, तसेच खेड तालुक्यातही ही संघटना कार्यरत आहे. त्यामुळे भागातील कामगार संघटनेशी जोडला गेला आहे. याचा फायदा शिवसेनेला लोकसभा निवडणुकीसाठीही होऊ शकतो. शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळ मतदार संघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची धुरा इरफान सय्यद सांभाळू शकतात.
निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नाही. मी कामगारांच्या हितासाठी लढा उभारला आहे. कामगारांच्या प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देत आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी माझ्यावर देतील ती मी यशस्वीपणे पार पाडण्याचा निश्चित प्रयत्न करेन.
– इरफान सय्यद, अध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटना