कामगार संघटनानी आता वेगळा विचार केला पाहिजे

0

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे आवाहन

पुणे : कामगार संघटना असह्य झाल्या आहेत. त्यांच्या समस्याकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ नाही. अशा सरकारबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सर्व कामगार संघटनानी आता वेगळा विचार केला पाहिजे, असे आवाहन माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने साखर कामगार प्रमुख कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार प्रतिनिधी मंडळाचे नेते जयप्रकाश दांडेगावकर तसेच मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

साखर उद्योग अडचणीत

साखर उद्योग अडचणीत आला आहे. केंद्र सरकारने साखरेची किंमत ठरवली आहे, पण किती कारखाने या किंमतीला साखर विकत आहेत? केंद्र सरकारने दिलेल्या दराने साखर उचलायला कोणीही तयार नाही. शासनसुद्धा साखर खरेदी करत नाहीये. त्यामुळे हा उद्योग अडचणीत आला आहे, असेही पवार म्हणाले. साखर व्यवसायाच्या अनेक अडचणी पुर्वी पासून आहेत, पण पुर्वी अडचणी घेऊन सरकारकडे गेले की न्याय मिळायचा आणि ती समस्या सुटली जायची. पण आता चर्चेला बोलाविले जाते. चर्चेत सगळ्या समस्या सोडविण्यात येतात पण ज्यावेळी कागदोपत्री निर्णय होतात त्यावेळी वेगळेच असते, त्यामुळे आता या सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी साखर कामगार प्रतिनिधींच्या विविध समस्या मांडण्यात आल्या.