धुळे । महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातील आगार व्यवस्थापक भगवान जगनोर यांच्या विरोधात शिवसेना प्रणित महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेने पुकारलेले धरणे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थिने झालेल्या सर्वमान्य तोडग्यानंतर व कामगारांच्या हिताच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी जाहीर केली. धुळे विभागीय एस.टी.महामंडळात आगार व्यवस्थापक व प्रशासनाने चालविलेल्या कामगारांविरोधातील मनमानीला विरोध करण्यासाठी एस.टी.कामगार सेनेने शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे भव्य धरणे आंदोलन आयोजित केले होते.
वाहक व चालकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी
धुळे विभागीय एस.टी.कार्यालयात प्रत्येक आगारांमधून वाहक व चालक कर्मचार्यांच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांचा विरोधात 18 ऑगस्ट रोजी या आंदोलनाची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनाही देण्यात आली होती. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर दादा भुसे यांनी धुळेएस.टी.प्रशासन आणि एस.टी.कामगार सेनेचे पदाधिकारी व कर्मचार्यांमध्ये बैठक घडवून आणत कामगारांचे प्रश्न सोडवून घेतलेत. पालकमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत चर्चा होवून तोडगा काढण्यात आला. या चर्चेत धुळे, नंदुरबार विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.शरद पाटील, नितीन जगताप, भाई देसले, हेमराज साळुंखे, बापू ढेकळे, रविंद्र चौधरी,मनोज गवळी, एम.जी.पाटील, राजेश पानपाटील, आय.एम.मिर्झा, सचिन सोनार, पी.वाय.पाटील, रवी वाघ, जगदीश महाले, दीपक बडगुजर, नंदू बगदे, राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी मनिषा सपकाळे, कामगार अधिकारी शिवाजी घोरपडे, वाहतूक अधिक्षक, किशोर महाजन व आगार व्यवस्थापक भगवान जगनोर उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, महानगरप्रमुख सतिष महाले, अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.