कामगार हॉस्पिटल दुर्घटना: गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी

0

मुंबई – अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलमध्ये काल घडलेल्या आग दुर्घटनेनंतर आज दुपारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला तर १५४ जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी रणजित पाटील आले असता त्यांना रोषाचा सामना करावा लागला. पाहणीनंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी रणजित पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

दरम्यान आज संध्याकाळी केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवाल, या खात्याचे केंद्रीय सचिव व इएसआयएसचे डायरेक्टर जनरल हे मुंबईत येत असून या हॉस्पिटलला भेट देणार आहेत.

यावेळी कामगारांनी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉरपरेशन(एनबीसीसी) विरोधातदेखील जोरदार घोषणाबाजी केली. गेली १० वर्षे येथे एनबीसीसीच्या माध्यमातून नव्या इमारतीचे काम संथगतीने सुरू आहे. मात्र यावर केंद्र आणि राज्य सरकार दोघांचीह लक्ष नसल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. या हॉस्पिटलचे फायर ऑडिट गेली अनेक वर्षे झाले नसून यामध्ये अनेक त्रुटी आहेत. याकडे देखील कामगारांनी लक्ष वेधले.