जि.प.च्या सर्व विभागांसह पंचायत समितीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि फिंगर प्रिंट मशिन बसविण्यात येणार
कार्यालयीन वेळेत कर्मचारी टेबलवरुन गायब होत असल्याची तक्रार
जळगाव । जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांच्या तसेच सीईओंच्या अनुपस्थितीत कर्मचारी दुपारपासून गायब होतात अशी तक्रार जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणार्या नागरिकांकडून होत असते. त्यााच पार्श्वभूमीवर झेडपी सभापतींसह सदस्यांनी कार्यालयाला भेटी देत झाडाझडती केली असता त्यांना कर्मचारी टेबलावरुन गायब झाल्याचे दिसून आले. कर्मचारी कार्यालयीन वेळेअगोदरच गायब होण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व झेडपीतील सर्व विभागात आणि तालुकास्तरीय पंचायत समितीत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच फिंगर प्रिंट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘आयटी सेल’कडून कर्मचार्यांचे आधारकार्ड ठसे मागविण्यात आले असून महिन्याभरात जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्या सर्व विभागात ही यंत्रणा कार्यान्वित करणार येणार असल्याची माहिती सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास कर्मचार्यांच्या कामचुकारपणाला लगाम लागणार आहे.
नरेगा कामाची तपासणी करणार
चाळीसगाव तालुक्यात २०१६-१७ या वर्षातील रोजगार हमी योजनेंतर्ग आराखड्याबाहेरील कामे झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेमार्फत याकामांची तपासणी करण्यात येणार आहे. अधिकारी प्रत्यक्ष चाळीसगाव तालुक्यात जाऊन या कामाची चौकशी करणार असल्याचे सीईओंनी सांगितले. तर रोजगार हमी योजनेंतर्गत चार तालुक्यात ८५० विहीरींची कामे करण्यात आलेली आहे मात्र रक्कम देण्यात आलेली नसल्याची तक्रार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत याची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
थकीत बिले ग्रा.प.ने भरावी
ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणार्या पाणीपुरवठा योजनावरील वीज बीले थकीत झाली आहे. थकील वीज बीलामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केले होते. मार्च २०१७ मध्ये ११ कोटी थकीत बीले जि.प.तर्फे अदा करण्यात आली आहे. मात्र यापूढे आता पाणीपुरवठा योजनांवरील वीज बीले ग्रामपंचायतीने वसुलीच्या माध्यमातून भरावी लागणार आहे. पाणीपुरवठा योजनेपोटी दरमहिन्याला ५० हजाराची तर वर्षाला ६ कोटींची वीज बील येत असते. ग्रामपंचायतीने याची तजविज करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
‘एक दिवस शाळेसाठी’
जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी अनेक तक्रारी असतात. तक्रारींची दखल घेत ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांना महिन्यातून एकदा वरिष्ठ स्तरावरील अधिकार्यांनी भेट देण्याची नियोजन करण्यात येत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांबद्दल अधिक तक्रारी असतात त्यादृष्टीने आरोग्य केंद्रालाही अधिकार्यांमार्फत भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. दिवाळीनंतर या उपक्रमाला सुरुवात केली जाणार असल्याचे सीईओंनी सांगितले.
जलयुक्तसाठी प्रस्ताव
दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान उपक्रम हाती घेतला आहे. जलयुक्तंतर्गत ७० टक्के कामे पाणी मुरविण्यासाठी तर ३० टक्के कामे पाणी साठवणुकीसाठी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जलयुक्त अंतर्गत कमी मात्र चांगल्या दर्जाची कामे व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु असून जलयुक्तच्या कामासाठी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय जिल्हा विकास यंत्रणा कार्यालयात गुरुवारी २१ रोजी झालेल्या जलयुक्तच्या बैठकीत घेण्यात आला.