पिंपरी-चिंचवड : पावसाळ्यात विजेचा लपंडाव नेहमीच होतो. मात्र, यासंदर्भात माहिती देऊनही वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी येतात. कामचुकारपणा करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशारा पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी दिला आहे.
अधिकार्यांनी सतर्क रहावे
संततधार पावसामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज कंपनीच्या अधिकारी व जनमित्रांनी सतर्क रहावे. वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता शिंदे यांच्याकडून सर्व विभागातील वीजपुरवठ्याच्या स्थितीचा दररोज सकाळी व सायंकाळी आढावा घेतला जात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी. वीज अपघात टाळण्यासाठी जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा व सतर्कपणे दुरुस्तीचे काम करावे व नागरिकांनाही वीज अपघात टाळण्याबाबत उपाययोजनांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.