कामशेत : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कामशेत जवळील पवना पोलीस चौकीसमोर भरधाव ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात कार व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
कारचा पुढचा टायर फुटला
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी (एमएच 04 एचएन 4923) क्रमांकाची हुंडाई कारचा पुढील बाजूचा डावीकडील टायर फुटला. त्यामुळे कारचालक कार रस्त्याच्या कडेला घेत होता. त्याचवेळी मागून भरधाव येणारी (एमएच 09 एल 858) क्रमांकाच्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. या अपघातात कारमध्ये बसलेले सौरभ कुमार (रा. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तर कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचार्यांनी दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून निगडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
काही काळ वाहतूक ठप्प
पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परंतु महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.