हडपसर : मांजरी, घोरपडी, लुल्लानगर येथील उड्डाणपूल शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मंजूर झाले असून या कामांचे श्रेय घेण्याचा पोरकटपणा भाजपचे आमदार करत आहे, अशी टीका सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हांडेवाडी रोड येथे बोलताना केली. नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या प्रभागतील विकासकामांचा शुभारंभ आढळराव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख महादेव बाबर, विजय देशमुख, समीर तुपे, संगीता ठोसर, अमोल हरपळे, बाळासाहेब भानगिरे, जयसिंग भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, आशिष आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
वकासकामांच्या जोरावर चौकार मारणार
खासदार म्हणून काम करत असताना 14 हजार कोटी रुपयांची कामे सुरू केली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाला दिशा दिली. हडपसर मतदार संघातील रस्ते, उड्डाणपूल, पाणीपुरवठा, भुयारी मार्ग आदी प्रश्न शिवसेनेच्या प्रयत्नातून मार्गी लागले आहेत. चमकोगिरी करणार्यांनी भ्रष्टाचार सोडून काय केले याचे उत्तर द्यावे. विकासकामांच्या जोरावर यावेळी विजयाचा चौकार मारणार असल्याचा विश्वास खासदार आढळराव यांनी यावेळी व्यक्त केला.
कोट्यवधी रुपयांची विकासकामे सेनेने सुरू केलेली आहेत. हांडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण, फुटबाल ग्राउंड, रुग्णालय, जिम, जलतरण तलाव, विविध भागांत पाण्याच्या टाक्या, भुयारी मार्ग आदी विकासकामांमुळे प्रभाग क्र.26 चा कायापालट होणार आहे.