उल्हासनगर । बदलापूर शहरातील सुमारे 300 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेत झालेला भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत असल्यामुळे या योजनेतील दुसर्या टप्प्यातील कामासाठी एकही कंत्राटदार पुढे येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दुसर्या टप्प्यातील कामांसाठी आतापर्यंत तीन वेळा निवीदा मागवण्यात आल्या, पण कंत्राटदारांकडुन प्रतिसाद न मिळाल्याने आता या योजनेतील काम रखडले आहे. त्यामुळे कुणी ठेकेदार देता का ? ठेकेदार अशी म्हणण्याची वेळ कुळगाव बदलापूर प्रशासनावर आली आहे. कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीत भुयारी गटार योजना, प्रशासकीय इमारत आणि बी एस युपी योजना यासारखे मोठे प्रकल्पांसाठी राज्य शासन व केंद्र शासनाचा निधी मिळाला आहे. परंतु यातील कोणतीही योजना पूर्णत्वास गेली नाही. प्रत्येक योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने त्या योजनांची शासनाकडे चौकशी मागणी होत असल्यामुळे कोणताही ठेकेदार पुढे येत नसल्याची चर्चा शहरात सुरु आहे. कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या भुयारी गटाराच्या पहिल्या टप्प्याची 150 कोटींची योजना 300 कोटी रुपयांपर्यंत पोहचली तरी भुयार गटार योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या योजनेतील कामाच्या बिलावरुन पालिकेत वाद निर्माण झालेला आहे. या वादाचा फटका हे भुयारी गटार योजनेच्या दुसर्या टप्प्यातील कामावर बसला आहे. बदलापूर पालिकेच्या भुयारी गटाराच्या दुसर्या टप्प्याचे काम हे 31 कोटी 44 लाखांची आहे.
निविदा पुन्हा मागवण्याची वेळ
या योजनेत उल्हास नदीला जाणारे सांडपाणी अडवुन त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेचे काम झाल्यास उल्हासनदीत सोडल्या जाणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन नदीतील प्रदुषण कमी करण्यास मदत होणार आहे. या कामाची पहिली निविदा 19 डिसेंबर 2017 मध्ये काढण्यात आली. मात्र त्या निविदेला कोणीच साथ दिली नाही. कंत्राटदारांनी निविदाच न भरल्याने ही निविदा पुन्हा मागविण्याची वेळ पालिकेवर आली. कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ फिरविल्यावर 9 फेब्रुवारी 2018 मध्ये पुन्हा ही निविदा मागविण्यात आली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर 15 मार्च रोजी पुन्हा निविदा मागविण्यात आली. या निविदेलाही कोणीच प्रतिसाद दिला नाही. तीन वेळा निविदा मागवुनही कंत्राटदारपुढे येत नसल्याने याची कारणे शोधण्याचे काम सुरु झाले आहे. महापालिकेतील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत निविदा भरण्यासाठी कंत्राटदाराची गर्दी होते. येवढेच नव्हे तर अनेक कंत्राटदार हे त्यासाठी टेंडर मॅनेज करण्यात व्यस्त असतात. मात्र बदलापूरातील दुसर्या टप्प्यातील भुयारी गटार योजनेच्या कामात कंत्राटदार पुढे न येण्यामागे पालिका प्रशासनावर त्याचा ठपका ठेवला जात आहे. मात्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरीच्या वेळेस त्यात काही बदल केल्यामुळे याची रक्कम थेट 31 कोटी 44 लाख रुपये इतकी कमी झाली आहे. त्यामुुळे नव्या प्रस्तावानुसार काम करण्यास कंत्राटदारांना स्वारस्य नसल्याने ही मंडळी निविदा भरण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे.