कामाच्या शोधात पुण्याला जाणार्‍या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

0

भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील घटना: रेल्वे दरवाजात उभे राहणे बेताले जीवावर

भुसावळ : मित्रांसोबत रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुणे येथे जात असलेल्या उत्तम बिसन सोनवणे (वय 35, रा.धानखेड, ता.बोदवड) या तरुणाचा भुसावळ रेल्वे स्थानकानजीक रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सकाळी 7.30 वाजेपूर्वी घडली. उत्तम हा जनरल बोगीत गर्दी जास्त असल्याने फाटकात उभा होता. गर्दीमुळे तोल जावून तो रेल्वेतून पडलाची माहिती सोबतच्या मित्रांनी दिली.

मित्रांसोबत पुण्याला जाणासाठी रेल्वेत बसला

धानखेड येथे उत्तम बिसन सोनवणे हा पत्नी रेखा, तीन मुली व एक मुलगा या कुटुंबासह वास्तव्यास होता. रोजगार नसल्याने हातमजुरी करुन उदनिर्वाह सुरु होता. चुलत भाऊ गजानन सोनवणे, संजय सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, अरुण धोबी यांचे रोजगाराच्या शोधात पुणे येथे जात होते. त्याच्यासोबत उत्तम सोनवणेही जाण्याचे ठरले. नियोजनानुसार सर्व जण सोमवारी रात्री मलकापूर येथून महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पुणे येथे जाण्यासाठी बसले.

मित्रांसमोरच पडला रेल्वेतून खाली

जनरल बोगीत मित्र बसले. गाडीत गर्दी असल्याने उत्तम हा रेल्वेच्या फाटकात उभा होता. गाडीने भुसावळ पोहचणार तोच गर्दीमुळे उत्तमचा तोल गेला अन् तो रेल्वेतून खाली पडला. मित्रांच्या समोरच हा प्रकार घडल्याने भुसावळ स्थानक येताच सोबतच्या चुलतभाऊ तसेच मित्रांनी गाडीतून उतरुन घटनास्थळ गाठले. मात्र उत्तम सापडला नाही. मंगळवारी सकाळी भुसावळ स्टेशन मास्तर बी.के.तनकू यांनी लोहमार्ग पोलिसांना प्रकार कळविला.

अन् पत्नीला मिळाली दुःखद बातमी

भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शाम बोरसे, पोलीस नाईक राजू अढाळे यांनी घटनास्थळ गाठले. यादरम्यान उत्तमच्या शोधात असलेले मित्र पोलीस ठाण्यात चौकशीसाठी पोहचले होते. त्यांनी मृतदेह उत्तमचा असल्याची ओळख पटविल्यावर मित्रांना सोबत घेत लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह उत्तमच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुण्याला पोहचून रोजगार मिळाल्याची आनंदवार्ताची वाट पहात असलेल्या उत्तमची पत्नी रेखा हिला पुणे पोहचण्यापूर्वी रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी कळाली. तिचा मन हेलावणार आक्रोश होता. उत्तमचे आई, वडीलांचे लहानपणी निधन झाले आहे. मुलगी ज्योती विवाहित असून इतर मुली व मुलगा शिक्षण घेत आहे. उत्तमच्या मृत्यूने मुलांचे पितृछत्र हरपले असून कुटुंब उघड्यावर पडले आहे.