कामात दिरंगाई होत असेल तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

0

आमदार राजूमामा भोळे यांचे आयुक्तांना पत्र

जळगाव-आमदार,खासदार निधी,मनपा निधीसह विविध योजनार्तंगत निधीतून शहरातील विकासकामांचे ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत.मात्र ठेकेदारांनी अद्यापपर्यंत कामांना सुरुवात केली नाही.काही ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन झाल्यानंतरही कामांना सुरुवात केली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.त्यामुळे कामे करण्यास दिरंगाई करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशा आशयाचे पत्र आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना दिले असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले. 25 कोटींच्या निधीतील काही कामे प्रलंबित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शहराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी दिला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी दिला होता.त्यानुसार कामांचे नियोजन करुन आणि निविदा काढून ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले आहे.मात्र काही ठेकेदारांनी काही कामे अद्यापही पूर्ण केलेले नाहीत.तसेच आमदार,खासदार,मनपा निधी आणि विविध योजनांच्या निधीतून करावयाच्या विकासकामांसाठी देखील ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत.मात्र बहुतांश कामे अद्यापही सुरु केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच काही ठिकाणी कामांचे भूमिपूजन करुन देखील कामे सुरु न केल्याने नागरिकांची ओरड होत असल्याने सबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र आमदार राजूमामा भोळे यांनी आयुक्तांना दिले आहे. ठेकेदार कोणाच्याही जवळचे असोत जर ते कामे करण्यास दिरंगाई करीत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना देखील केली असल्याचे आमदार भोळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.